रत्नागिरी : निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही, हे वाक्य सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांच्या तोंडी ऐकायला मिळत आहे. गणपतीपुळेसह गुहागर, दापोली तालुक्यात जल व साहसी क्रीडा पर्यटनातून दरवर्षी कोटींच्या घरात उलाढाल होते; मात्र यंदा पंधरा दिवस आधीच आलेल्या पावसाने साहसी क्रीडा पर्यटन व्यावसायिकांना दणका दिला असून, ऐन हंगामात १० दिवसआधी हंगाम गुंडाळावा लागल्यामुळे सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मागील काही वर्षात दापोली तालुक्यातील हर्णे, कर्दे, गुहागर आणि पालशेत तर रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे, मालगुंड, नेवरे काजीरघाटी, आरे-वारे या ठिकाणी किनारी भागात साहसी क्रीडाप्रकारांसह नौकानयन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे किनाऱ्यावरील पर्यटनाला मोठी चालना मिळत आहे. मागील वर्षाच्या शेवटच्या टप्यात ख्रिसमसपासून पर्यटन हंगामाला सुरुवात झाली.
त्यानंतर जानेवारी, मार्च, एप्रिल या महिन्यात दर शनिवार व रविवारी सुटीच्या दिवशी पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल होत होते. त्याचा फायदा पर्यटन व्यवसायाला झाला होता. त्यामुळे जलपर्यटनाला प्रतिसाद चांगला मिळत होता; परंतु युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती, बारावी व दहावीचे निकाल जाहीर झाल्याने पाल्यांच्या पुढील प्रवेशाची तयारी या कारणांमुळे मे महिन्याच्या सुरुवातीला पर्यटकांचा राबता कमी झालेला होता. त्याचा परिणाम मे महिन्यातील पर्यटन व्यवसायावर झाला. त्यामधून वातावरण निवळल्यानंतर पर्यटकांनी कोकणातील किना-यांकडे धाव घेतली, परंतु निसर्गाने त्यात अडथळा आणला.
१५ मेनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि समुद्र खवळला. त्याचा परिणाम पुन्हा पर्यटन व्यवसायावर झाला. सुमारे दहा दिवस आधी पाऊस सुरू झाल्यामुळे पर्यटकांचा किनाऱ्यावरील राबता कमी झाला आहे. त्यामुळे सुमारे दहा लाखांचे नुकसान साहसी खेळाद्वारे व्यवसाय करणाऱ्यांचे झाल्याचा अंदाज आहे. गणपतीपुळे किनारी १७ नौका आणि १२ जेट स्की आहेत त्याशिवाय नेवरे किनारी स्कुबा डायव्हिंग चालवले जाते तसेच वरवडे, भंडारपुळे, मुरूड, कर्दे, हर्णे यांसह विविध किनाऱ्यांवर साहसी पर्यटन व्यवसाय सुरू आहेत. पर्यटन हंगामामध्ये जिल्ह्यात सुमारे दररोज २० लाखांची उलाढाल होते.
यंदा मे महिन्यात उशिराने पर्यटक कोकणात दाखल होण्यास सुरुवात झाली होती: मात्र निसर्गाकडूनच साथ न मिळाल्याने त्यात खंड पडला आहे. त्यामुळे सर्वच व्यावसायिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. कामगारांचे पगार देणेही यंदा कठीण झालेले आहे- उदय पाटील, पर्यटन व्यावसायिक, गणपतीपुळे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 PM 28/May/2025














