मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातानंतर मदतकऱ्यांविरुद्ध गुन्हा: रत्नागिरीत संतापाची लाट!

रत्नागिरी, २८ मे २०२५: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तुरळ येथे दोन दिवसांपूर्वी डंपर आणि खासगी आराम बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातानंतर मदतकार्यात गुंतलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा संघटकासह तिघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने रत्नागिरी जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. मदत करणाऱ्यांवरच गुन्हा दाखल झाल्याने “मदत करणे गुन्हा आहे का?” असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

काय आहे प्रकरण?
तुरळ येथे झालेल्या भीषण अपघातानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा संघटक संतोष थेराडे, तसेच अरविंद जाधव आणि रामचंद्र हरेकर हे तात्काळ अपघातस्थळी धावले. त्यांनी जखमींना मदत करण्यासह वाहतूक सुरळीत करण्यासाठीही प्रयत्न केले. मात्र, याचवेळी घटनास्थळी पोहोचलेले पोलीस कर्मचारी अनिकेत चव्हाण यांनी या तिघांनी आपल्याला धक्काबुक्की व शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप करत संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या तक्रारीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना नोटीसही बजावण्यात आली आहे.

अपघातानंतर वाहतूक ठप्प
या अपघातामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुमारे पावणे दोन तास ठप्प झाली होती, ज्यामुळे अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. राष्ट्रीय महामार्गावर घडलेला अपघात आणि त्यानंतर वाहतूक रोखून धरण्याचा पोलिसांचा निर्णय यावरही प्रवाशांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

“मदत करणे गुन्हा आहे का?” – संतोष थेराडे
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संतोष थेराडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “अपघातानंतर आम्ही तब्बल चार तास वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि जखमींना मदत करण्यासाठी प्रयत्न करत होतो. महामार्गावरील खड्ड्यांविषयी आम्ही नेहमी आवाज उठवला, पण आता आमच्यावरच गुन्हे दाखल होत आहेत. अपघातात मदत करणे हा गुन्हा आहे का? असेच जर चालणार असेल, तर भविष्यात कोणीही मदतीस पुढे येणार नाही.”

स्थानिक नागरिकांमध्येही या घटनेमुळे पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संकटात सापडलेल्यांना मदत करणाऱ्यांविरोधातच कारवाई करण्याच्या या निर्णयावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यामुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर सर्व स्तरातून टीका होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 28-05-2025