राजापूर : गेल्या पंधरा दिवसांपासून तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असून उन्हाळ्यामध्ये कोरड्या ठणठणीत असलेल्या अर्जुना-कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. काही ठिकाणी घरांची पडझड होऊन नुकसान झाले असून, महावितरणच्या प्रयत्नानंतरही विजेचा लपंडाव कायम आहे.
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी येथील प्रांताधिकारी कार्यालयामध्ये तालुक्याची प्रशासकीय बैठक घेऊन नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.
प्रांताधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या या बैठकीला प्रांताधिकारी डॉ. जैस्मिन, तहसीलदार विकास गंबरे, पोलिस निरीक्षक अमित यादव, नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे, कार्यालय अधीक्षक जितेंद्र जाधव, महावितरणचे क्षीरसागर यांच्यासह विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मॉन्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे.
वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड होऊन नुकसान झाले आहे. महावितरण विभागाचे अनेक गावांमधील विजेचे खांब कोसळून वीजपरवठा खंडित झाला आहे. त्याचवेळी महावितरण विभागाचे खांब पडल्याने नुकसानही झाले आहे. मॉन्सूनपूर्व पावसामध्ये वादळी वाऱ्यांसह समुद्रही खवळला आहे. पुढील काही दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी तालुक्यातील सर्व प्रशासकीय विभागांची बैठक घेतली.
या बैठकीमध्ये सिंह यांनी तालुक्यातील सर्व विभागांच्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात करावयाच्या उपायोजनांबाबत केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला.
सर्व दरडग्रस्त भागात दक्षता
धोपेश्वर खंडेवाडीसह अन्य भागातील दरडग्रस्त भागांमध्ये अधिक सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. शहरातील अर्जुना व कोदवली नद्यांची पाहणी करताना पूरस्थिती उद्भवणाऱ्या ठिकाणांना भेटीही दिल्या. शहरातील पूरपरिस्थितीत पाण्याखाली जाणाऱ्या रोहित्राची पाहणी केली. धोपेश्वर खंडेवाडीसह अन्य सर्व दरडग्रस्त भागांत विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 28/May/2025














