रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्ग बावनदीपासून पुढे संगमेश्वरपर्यंतचा रस्ता अक्षरशः चिखलमय झाला आहे. या मार्गावरून जाताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. दुचाकी वाहने तर सरकण्याच्या भीतीने जीव मुठीत घेऊन चालवावी लागत आहेत. ठेकेदार कंपनी आणि प्रशासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे वाहनधारक यंत्रणांच्या नावे खडे फोडत आहेत.
मुंबई-गोवा महामार्गाचे १३ वर्षानंतरही दुखणे कायम आहे. अनेक मंत्र्यांनी हवाई पाहणी केली, महामार्गावरून पाहणी केली, ठेकेदार कंपन्यांना सूचना दिल्या; परंतु त्यामध्ये फारसा फरक पडला नाही. नवीन सरकार आले की, महामार्ग पूर्ण होण्याची नवीन डेडलाईन दिली जाते; मात्र काम काही पूर्ण होत नाही. मे महिन्यात सुरू झालेल्या पूर्वमोसमी पावसामुळे महामार्गाच्या कामाची दैना झाली आहे. महामार्गात अनेक ठिकाणी पाणी भरलेले आहे. काही ठिकाणी तर पाणी जाण्याचा मार्ग नसल्याने दुकान किंवा घरात पाणी घुसले; परंतु बावनदी ते संगमेश्वरपर्यंतच्या रस्त्याची वेगळीच दशा झाली आहे. या रस्त्याच्या आढाव्यामध्ये रस्त्याचे विदारक चित्र पुढे आले.
बावनदीपासुन पुढे संगमेश्वरपर्यंत महामार्गावर चिखलाचे साम्राज्य आहे. काम सुरू असल्याने माती रस्त्यावर येऊन रस्ता चिखलमय झाल आहे. यातून मार्ग काढताना चारचाकी वाहनधारकांना कसरत करावी लागतच आहे; परंतु दुचाकीधारांना नको नकोसे करून सोडणारा हा रस्ता बनला आहे. रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य असल्यान मार्ग काढणे कठीण बनले आहे. त्यात दुचाकी घसरण्याची शक्यता असल्याने जीव मुठीत घेऊन मार्ग काढावा लागत आहे, असा अतिशय धोकादायक महामार्ग बनला आहे. याबाबत ठेकेदार कंपनी किंवा प्रशासनाकडून कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणारा प्रत्येक वाहनधारक शासन, प्रशासन आणि ठेकेदाराबाबत बोट मोडत आहेत.
तात्काळ उपाययोजनांची गरज
जून महिना अद्याप सुरु झालेला नाही. पावसाळ्यात वाईट अवस्था होण्यापूर्वी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त केली आहे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 PM 28/May/2025














