दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची कोकणवासीयांची तीव्र मागणी; प्रवाशांचे हाल सुरुच!

खेड, २८ मे २०२५ : मुंबईतील पश्चिम उपनगरांमध्ये राहणाऱ्या हजारो कोकणवासीय प्रवाशांकडून पूर्वीची दादर-रत्नागिरी पॅसेंजर (गाडी क्र. ५०१०४/५०१०३) पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ही पॅसेंजर गाडी आता रत्नागिरी-दिवा पॅसेंजर म्हणून धावत असली तरी, कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची पूर्वीची सोय पूर्णपणे बंद झाल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे.

प्रवाशांची मोठी कसरत आणि सोयींची वानवा
कोव्हिड-१९ च्या आधी दादर-रत्नागिरी पॅसेंजरला दोन आरक्षित डबे होते, तसेच संगमेश्वर, चिपळूण आणि खेड येथे प्रत्येकी एक अनारक्षित डबा प्रवाशांसाठी उपलब्ध होता. यामुळे कोकणातील उत्तरेकडील स्थानकांमधून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा आधार मिळत होता. मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या स्थानकात पोहोचण्याआधीच गर्दीने ओसंडून वाहत असल्याने आरक्षण असूनही आपली जागा मिळेल याची शाश्वती नसायची. अशावेळी अनारक्षित डब्यांचा मोठा आधार असे.

परंतु, आता रत्नागिरी-दिवा पॅसेंजर वगळता, कोकण रेल्वे मार्गावरून पूर्वीप्रमाणे दादरहून सोडली जाणारी पॅसेंजर गाडी बंद आहे. परिणामी, दादर-रत्नागिरी पॅसेंजरची पूर्वीची सोय बंद झाल्याने प्रवाशांना रत्नागिरी-दिवा एक्स्प्रेस पकडण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. सध्या आरक्षणही नाही आणि हक्काचे अनारक्षित डबेही नाहीत, अशी येथील प्रवाशांची व्यथा आहे. कोरोनानंतर सर्व गाड्या पूर्ववत झाल्यानंतरही कोकण रेल्वेने या महत्त्वपूर्ण सुविधा अद्यापही पूर्ववत केलेल्या नाहीत.

रेल्वे प्रशासनाकडे अनेक निवेदने, पण दखल नाही
रेल्वेविषयक अभ्यासक अक्षय म्हापदी यांनी दादर-रत्नागिरी पॅसेंजर पूर्वीप्रमाणे दादरहून सुरू करावी आणि संगमेश्वर, चिपळूण व खेडसाठी राखीव अनारक्षित डबे पूर्ववत करावेत यासाठी रेल्वे प्रशासनाला अनेक निवेदने दिली आहेत. मात्र, अद्याप या निवेदनांची दखल घेण्यात आलेली नाही.

यामुळे कोकणातील प्रवाशांच्या हालअपेष्टा सुरूच असून, रेल्वे प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करावी, अशी मागणी कोकणवासीय जनतेकडून जोरकसपणे केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 28-05-2025