चिपळूण : कोयना-पाटण रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा

चिपळूण : कराड ते चिपळूण मार्गावर कोयना-पाटण रस्ता सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. पावसाळ्यात या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, वाहन चालवणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे. जागोजागी पडलेले मोठमोठे खड्डे अपघातांना आमंत्रण देत आहेत. या रस्त्यावरून जाताना गाड्यांना मोठे हेलकावे खावे लागत आहेत.

या मार्गावरून चिपळूण बाजारपेठेत सातारा, कराड, सांगली वरून भाजीपाला विक्रीसाठी येत असतो. त्यामुळे चिपळूण आणि या जिल्ह्यांना दळणवळणासाठी हा मार्ग उपयुक्त आहे. या मार्गावरून सतत वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे मोठमोठे खड्डे पाहायला मिळत आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक असताना संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे या मार्गाची चाळण झाली आहे.

गेली सात ते आठ वर्षे या मार्गाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधींना या भागाकडे लक्ष देण्यासाठी सवडच मिळाली नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. १२ ते १३ किलोमीटरचा हा रस्ता पार करण्यासाठी तब्बल २ तास लागत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गुहागर-विजापूर राज्य महामार्गावरील हा पॅच आता मृत्यूचा सापळा ठरला आहे. सध्या या रस्त्याबद्दल अनेक मेम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 PM 28/May/2025