कोल्हापूर : पावसाळ्यात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये समन्वय ठेवला जाईल. अलमट्टी धरणातून किती आणि कधी विसर्ग करण्यात येणार आहे, याची पूर्वसूचना महाराष्ट्र प्रशासनाला वेळेत दिली जाईल.
अलमट्टीतील पाणीपातळी १५ ऑगस्टपर्यंत ५१७ ते ५१७.५० मीटरदरम्यान राखली जाईल, अशी माहिती कर्नाटक प्रशासनाने मंगळवारी दिली. या विषयावर महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्य सचिवांच्या संयुक्त समितीची बैठक उद्या, गुरुवारी, २९ मे रोजी होणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत सांगली, तसेच कर्नाटकातील बेळगाव आणि विजापूर या पूरप्रवण जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे पुराचा धोका कमी करण्यासाठी उपाययोजना व समन्वयावर चर्चा झाली.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे, बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, विजापूरचे जिल्हाधिकारी संबित मिश्रा, कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, सांगलीचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे, कोल्हापूर जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, सांगलीचे अधीक्षक अभियंता सी. एच. पाटोळे, अलमट्टी धरणाचे प्रमुख अभियंता यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र, कर्नाटक प्रशासनातील समन्वयातून कोल्हापूर-सांगलीतील पूर रोखण्यासाठीच्या उपाययोजना करण्याचा निर्णय झाला. पंचगंगा व कृष्णा नद्यांतील पाण्याची पातळी, अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील पूरस्थिती, तसेच आंतरराज्य समन्वयातून दोन्ही राज्यांमधील जलस्रोत विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनांनी एकत्र येऊन पूर व्यवस्थापनासाठी ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय झाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 28-05-2025














