रत्नागिरी : नाले-गटारे तुंबली नाहीत

रत्नागिरी : शहरातील नाले आणि गटारांची स्वच्छता मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच पूर्ण झाली. त्यामुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कुठेही नाले, गटारे तुंबल्याची तक्रार पालिकेकडे आली नाही.

गेल्या वर्षी पहिल्याच पावसात रामआळी आणि आजुबाजूच्या बाजारपेठेत पाणी तुंबून रस्त्यावर आले होते. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून पावसाळ्यापूर्वीची साफसफाई ही एप्रिल महिन्यापासूनच सुरू होते. त्याचबरोबर वेगवेगळ्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि तक्रारीनुसार नाले, गटारांची स्वच्छता केली जात असते. मॉन्सून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता असते; आरोग्य विभागाने एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून शहरातील नालेगटारे स्वच्छ करण्याचे नियोजन केले होते.

शहरातील १० मोठे नाले आणि गटारांची एप्रिल महिन्यापासून सुरू झालेली साफसफाई मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण झाली. मे महिन्यात पडलेल्या पावसाने गटारे तुंबल्याची तक्रार पालिककडे आली नसल्याचे आरोग्य निरीक्षक संदेश कांबळे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:54 28-05-2025