रत्नागिरी : विधी सेवातर्फे निराधार मुलांसाठी ‘साथी मोहीम’

रत्नागिरी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई याच्या निर्देशानुसार निराधार मुलांना कायेदशीर ओळख प्रदान आणि सामाजिक कल्याण प्रवेश सुलभ करण्यासाठी १३ मे ते १५ ऑगस्ट या कालावधीत साथी मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान केवळ मुलांची ओळख निर्माण न करता त्यांना शिक्षण, आरोग्य, निवारा, सामाजिक समावेश आणि कायदेशीर संरक्षणाच्यादृष्टीने आवश्यक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

या मोहिमेचे उद्दिष्ट हे निराधार मुलांना कायेदशीर ओळख प्रदान करण्यासाठी आणि सामाजिक कल्याण प्रवेश सुलभ करण्यासाठी आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयातर्फे मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करण्याकरिता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गोसावी तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्या आदेशानुसार साथी समितीची स्थापना करण्यात आली आहे.

या समितीमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरीचे सचिव हे अध्यक्ष तसेच समन्वयक म्हणून काम पाहणार आहे. समितीच्या सदस्यामध्ये जिल्हा बालसरंक्षण अधिकारी रत्नागिरी, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुका तहसीलदार, जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा आरोग्य अधिकारी रत्नागिरी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक रत्नागिरी, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी रत्नागिरी व पोलिस अधिकारी विशेष बाल पोलिसपथक प्रमुख, निरीक्षणगृह-बालगृहाचे अधीक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांचे पॅनलवरील पॅनल विधीज्ञ तसेच कायदासाथी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

१५ ऑगस्टपर्यंत कालावधी
साथी समितीची राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांचेकडील नियोजित वेळापत्रकाप्रमाणे मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे माणिकराव सातव यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:07 PM 28/May/2025