चिपळूण : मॉन्सून वेळेआधीच दाखल झाल्याने मे महिना अखेरीस घाईघाईने सुरू असलेली कामे अर्ध्यावरच रखडलेली आहेत. त्यातच सोमवारी येथे झालेल्या पावसात परशुराम घाटाच्या मध्यवर्ती ठिकाणच्या रस्त्यावर माती येऊन वाहतुकीला धोका निर्माण झाला होता. गुहागर मार्गावरदेखील मिरजोळी उक्ताडदरम्यान रखडलेल्या गटारकामाची माती रस्त्यावर आल्याने पाणी साचून वाहतूक ठप्प झाली होती याशिवाय शहरातही काही ठिकाणी रस्त्यांच्या नूतनीकरणाचे तसेच उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने तेथेही चिखल साचून दुचाकी घसरण्याचे प्रकार घडले.
तीन दिवस सलग मुसळधार पाऊस कोसळत आहे. रविवारी सकाळपासूनच येथे पावसाचे संततधार सुरू होती. सोमवारीदेखील पावसाचा जोर कायम होता. या पावसामुळे वाशिष्ठी व शिवनदीच्या पाणीपातळीतदेखील वाढ झाली, मात्र या पावसाचा वाहतूकदारांसह नागरिकांना अनेक ठिकाणी फटका बसू लागला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात मध्यवर्ती ठिकाणी रस्त्याच्या बाजूने गटार न काढल्याने डोंगराची माती थेट रस्त्यावर आली. त्यामुळे येथे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती.
गुहागर मार्गावरील मिरजोळी ते उक्ताडदरम्यान रस्त्यालगत गटाराचे काम सुरू असून, त्यासाठी खोदाई केली आहे. पावसामुळे हे देखील काम अर्ध्यावर रखडले आहे. परिणामी, येथील माती पाण्याबरोबरच रस्त्यावरून वाहू लागल्याने येथेही वाहतुकीला धोका निर्माण झाला होता. तसेच फरशी तिठा येथे रेल्वेपुलाखाली मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने येथेही काही वाहने अडकून पडली होती तर काही वाहनधारकांनी पर्यायी मागनि जाणे पसंत केले. शहरातील नागरिकांचीदेखील मोठ्या पावसामुळे तारांबळ उडाली आहे. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्यासह झाड्यांच्या फांद्या तुटून पडल्या.
ऐन पावसाच्या तोंडावर कामे
स्वामीमठ ते रामतीर्थ दरम्यानच्या रस्त्याचे नूतनीकरणाचे काम ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हाती घेतले आहे. नुकतेच येथे मकिंग टाकून भराव करण्यात आला होता; मात्र पावसामुळे हा संपूर्ण रस्ता चिखलमय बनला असून, येथे काही दुचाकी घसरून पडल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:27 PM 28/May/2025














