कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी पहाटेपासून दमदार पाऊस कोसळला. दिवसभर काहीशी उसंत घेतली असली तरी अधूनमधून रिपरिप सुरूच आहे. धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.
राधानगरी ४७ टक्के, तर तुळशी धरण ५२ टक्के भरले आहे. घरांच्या पडझडीसह इतर दोन लाखांचे नुकसान झाले असून, शेतीपिकांना मोठा फटका बसला आहे. नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असून दिवसभरात पंचगंगेची पातळी फुटाने वाढली.
हवामान विभागाने सोमवारी सायंकाळी सहानंतर कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट दिला होता. त्यामुळे लोक सोमवार सायंकाळपासूनच घाबरून होते. अनेकांनी दिवसभर घरातच थांबण्याची तयारी केली होती. मंगळवारी पहाटेपासून जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळला. दिवसभर चांगली उघडीप राहिली.
नद्या, ओढे दुथडी भरून वाहू लागले असून, काही नद्यांचे पाणी हळूहळू पात्राबाहेर पडू लागले आहे. सलग पाच दिवस पाऊस सुरू असल्याने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे. मंगळवारी रात्री पंचगंगेची पातळी १९.९ फुटांवर होती. १२ बंधारे पाण्याखाली गेले, तर काही ठिकाणी रस्त्यावर चिखल झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
कागलमध्ये सर्वाधिक पडझड
कागल तालुक्यात मुगळी, सिद्धनेर्ली, सोनगे, कापशी या गावांत घरांच्या भिंती कोसळून व केळीसह मका पीक वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. त्याचबरोबर पन्हाळा तालुक्यातही एका घराची भिंत कोसळली आहे. यामध्ये दोन लाख एक हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
तुळशी धरणक्षेत्रात ५१७ मिलिमीटर पाऊस
मे महिन्यात जिल्ह्यातील धरणे तळ गाठतात; पण ११ मेपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पाऊस तुळशी धरण क्षेत्रात सर्वाधिक ५१७ मिलिमीटर झाला आहे. राधानगरी धरणक्षेत्रात ३०० मिलिमीटर पाऊस झाला.
धरणसाठा जास्त कशामुळे
कोल्हापूर जिल्ह्यात अनेक वेळा जूनअखेरपर्यंत मान्सून ओढ देतो. त्या काळात पिकांसाठी, पिण्यासाठी पाणी लागते. त्यामुळे पाटबंधारे विभाग धरणात पुरेसा पाणीसाठा ठेवताे. यंदा अचानकच मान्सूनपूर्व जोरदार पाऊस सुरू झाल्याने धरणे निम्म्यावर आली आहेत.
गेल्या २४ तासांत धरण क्षेत्रात झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये व साठा टीएमसी –
धरण पाऊस (मिलिमीटर) साठा (टीएमसी)
राधानगरी २४ ४.००
तुळशी ६४ १.८३
वारणा ५ १३.७५
दूधगंगा ३६ ४.८४
कासारी ४८ ०.८१
कडवी २२ १.०६
कुंभी ४३ १.२५
पाटगाव ७५ १.५१
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:51 28-05-2025














