रत्नागिरी : बकरी ईद सणाच्या वेळी गोहत्या, गोवंश वाहतूक होऊ नये, तसेच सराईत गुन्हेगार आणि गोहत्या करणाऱ्या समाजकंटक यांच्यावर धडक कारवाई करण्याच्या अनुषंगाने विविध सामाजिक संस्थेचे गोरक्षक, कार्यकर्ते यांची रत्नागिरी शहर पोलिस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक सतीश शिवरकर यांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी बजरंग दलाचे विराज चव्हाण, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीचे जयदीप साळवी, देवेंद्र झापडेकर, अमित तात्याबा काटे, विश्व हिंदू परिषदेचे विशाल रमणीकलाल पटेल आदी गोरक्ष संयोजक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पोलिस निरीक्षक शिवरकर यांनी विविध सूचना देतानाच सराईत समाजकंटकाचे फोटो आणि दाखल गुन्ह्यांविषयी माहिती दिली.
डायल क्रमांकाचा ११२ जास्तीत जास्त वापर करणे, गोमांस वाहतूक करताना वाहन पकडले, तरी आरोपींना मारहाण न करता फोटो व आधार कार्ड आदी ताब्यात घेऊन पोलिसांना तत्काळ कळवावे. कोणतीही माहिती मिळाली, तर आगावू पोलिसांना कळवावे. स्वतः कायदा हाती घेतल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. शक्यतो, पोलिसांना घेऊनच कार्यवाही करावी, अशा सूचना शिवरकर यांनी दिल्या.
भाटे आणि मिरकरवाडा चेक पोस्ट येथे गोमांस वहन विरोधी पथक कार्यरत केल्याची माहितीही त्यांनी दिली, तसेच आपला मोबाइल नंबरही यावेळी सर्व कार्यकर्त्यांना दिला. योवळी गोमांस वहन करणाऱ्या संशयित गाडीचा फोटो तत्काळ आपल्या मोबाइल नंबरवर पाठवावा, तसेच नियंत्रण कक्ष किंवा ११२ वर कळवावे, असेही त्यांनी सूचित केले. त्याचबरोबर, निर्मनुष्य संशयित ठिकाणांची माहिती देण्याबाबतही पोलिस निरीक्षक शिवरकर यांनी आवाहन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:30 PM 28/May/2025














