रत्नागिरी : शीळ धरण ७१ टक्के भरले

रत्नागिरी : रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण तब्बल ७१ टक्के भरले आहे. या चरणाच्या इतिहासात प्रथमच मे महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणात धरण भरले आहे. मे महिन्यात दरवर्षी धरणात खडखडाट पाहायला मिळतो. पुढील सोमवारपासून प्रत्येक सोमवारी शहराला पाणीपुरवठा करण्याबाबतची रत्नागिरी नगर परिषदेकडून नियोजन केले जात आहे.

रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणाची पाणी साठवण क्षमता ३.३३६ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. गेल्या चार दिवसांच्या पावसाने धरणात २.६८७ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे २१ एप्रिलपासून सुरु झालेली प्रत्येक सोमवारची पाणी कपात पुढील सोमवारपासून रद्द करण्याची शक्यता आहे.

उन्हाळ्याच्या पाश्र्वभूमीवर दरवर्षी एप्रिल महिन्यापासून पाणी कपात केली जाते. यावर्षी शोळ धरणात पाणीसाठा समाधानकारक असल्याने २१ एप्रिलपासून दर सोमवारचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यास प्रारंभ झाला. परंतु आता मे महिन्यातच मुसळधार पाऊस पडल्याने धरणात ७१ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत मे महिन्यात धरणात इतके पाणी असण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:41 28-05-2025