रत्नागिरीत प्रामाणिक रिक्षाचालकाकडून ५ तोळे सोन्याची बॅग परत; पोलिसांकडून सत्कार!

रत्नागिरी, २८ मे २०२५ : रत्नागिरी शहरात आज एका प्रामाणिक रिक्षाचालकाने आपल्या माणुसकीचे दर्शन घडवत, रिक्षात विसरलेली सुमारे ५ तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग मूळ मालकिणीला परत केली. शहर पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर यांनी रिक्षाचालक मंगेश अशोक भोई यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

आज सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मुंबईहून आलेल्या सुकन्या रत्नदीप मिरजूळकर या गवळीवाडा, रत्नागिरी येथील रिक्षाचालक मंगेश अशोक भोई यांच्या रिक्षातून प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान मिरजूळकर यांची सुमारे ३,००,००० रुपये किमतीचे ५ तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग रिक्षामध्येच विसरली.

बॅग हरवल्याचे लक्षात येताच सुकन्या मिरजूळकर यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात कळवले. पोलीस ठाणे अंमलदार, पोलीस हेडकॉन्स्टेबल/४४२ अनुप पाटील आणि डिटेक्शनचे सहायक फौजदार साळवी यांनी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष श्री. संतोष सावंत यांच्या मदतीने सर्व रिक्षाचालकांशी संपर्क साधला. तसेच, हातखंबा येथील वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल/१६२६ नितीन जाधवर आणि सहायक फौजदार साळवी यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. या प्रयत्नांनंतर रिक्षाचालक मंगेश अशोक भोई यांच्याशी संपर्क साधण्यात यश आले.

रिक्षाचालक मंगेश अशोक भोई यांनी क्षणाचाही विलंब न लावता, सोन्याच्या दागिन्यांसह असलेली बॅग थेट पोलीस ठाण्यात आणली. तिथे सुकन्या रत्नदीप मिरजूळकर यांच्या समक्ष त्यांची बॅग सुस्थितीत त्यांना परत करण्यात आली.

मंगेश भोई यांच्या या प्रामाणिक कृत्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यांच्या या कृतीने समाजात चांगल्या मूल्यांची आणि प्रामाणिकपणाची आजही किंमत आहे हे दाखवून दिले आहे.