रत्नागिरीत ‘उत्कृष्ट पोलीस पाटील’ उदय लिमये यांची आत्महत्या; तालुक्यात खळबळ

रत्नागिरी, २८ मे २०२५ : रत्नागिरी तालुक्यातील कर्ला गावचे ‘उत्कृष्ट पोलीस पाटील’ म्हणून बहुमान मिळालेल्या उदय मधुसूदन लिमये यांनी आज सकाळी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुपारी दहा ते बाराच्या दरम्यान हा प्रकार घडल्याचे समोर आले असून, त्यांच्या अकाली मृत्यूने रत्नागिरी तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

उदय लिमये यांची पोलीस पाटील पदाची कारकीर्द अत्यंत चांगली होती. त्यांच्या कामाचे अनेकजण कौतुक करत असत आणि त्यांना नुकताच उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून गौरवण्यातही आले होते. आज सकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे पूजेसाठी फुले काढली, नाश्ता केला. त्यानंतर त्यांची पत्नी आणि मुलगी आपापल्या कामावर निघून गेल्या. याच दरम्यान, घरी कोणी नसताना उदय लिमये यांनी दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आपला जीव दिला.

दुपारच्या जेवणासाठी पत्नीने त्यांना फोन केला असता, त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे चिंताग्रस्त होऊन पत्नी घरी परतल्या. घराचा दरवाजा उघडाच होता आणि समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

उदय लिमये हे अत्यंत हळव्या मनाचे होते, मात्र त्यांच्यावर कोणतेही कर्ज नव्हते किंवा कौटुंबिक कलहही नव्हता. त्यांच्या एका मुलीचे लग्न झाले आहे, तर दुसऱ्या मुलीचे लग्न ठरले आहे. सर्वकाही व्यवस्थित असताना त्यांनी असा टोकाचा निर्णय घेतल्याने या घटनेचे गूढ वाढले आहे. रत्नागिरी शहर पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून, उदय लिमये यांचा मोबाईल तपासासाठी ताब्यात घेतला आहे. मोबाईलच्या सीडीआरची तपासणी केली जात आहे, ज्यामुळे आत्महत्येमागचे कारण स्पष्ट होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

अत्यंत चांगले काम करणारे आणि कोणाच्याही अध्यात-मध्यात नसणारे उदय लिमये यांच्या मृत्यूच्या तपासाचे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यांच्या निधनाने रत्नागिरी तालुक्याने एक चांगला आणि कार्यक्षम पोलीस पाटील गमावला असल्याची हळहळ परिसरात व्यक्त केली जात आहे.