आरवलीतील गरम पाण्याच्या कुंडांना रस्ता चौपदरीकरणाच्या कामाचा फटका; चिखलाने भरली कुंडे

संगमेश्वर : राष्ट्रीय महामार्गावरील रस्ता चौपदरीकरणाच्या कामामुळे संगमेश्वर तालुक्यातील आरवली गावातील ऐतिहासिक गरम पाण्याच्या कुंडांना मोठा फटका बसला आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे ही कुंडे सध्या चिखलाने भरली असून, त्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे.

आरवली हे गाव त्याच्या नैसर्गिक गरम पाण्याच्या कुंडांसाठी ओळखले जाते. या कुंडातील गंधकयुक्त पाण्याला त्वचा विकारांवर गुणकारी मानले जाते आणि त्यामुळे अनेक स्थानिक नागरिक तसेच पर्यटक येथे स्नानासाठी आवर्जून येतात. हे कुंडे केवळ आरवलीची ओळखच नाहीत, तर निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार म्हणूनही शेकडो पर्यटक आणि निसर्गप्रेमींना आकर्षित करतात. सध्या सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे आजूबाजूच्या ढिगाऱ्यांची माती या कुंडांमध्ये वाहून आल्याने ती पूर्णपणे चिखलाने भरली आहेत. ठेकेदाराने मे महिन्यापूर्वी हे काम युद्धपातळीवर पूर्ण करणे अपेक्षित होते, परंतु कामातील दिरंगाईमुळे या ऐतिहासिक स्थळाची दुर्दशा झाली आहे.

चुकीच्या मानवी हस्तक्षेपामुळे हे महत्त्वाचे नैसर्गिक ठिकाण धोक्यात आले आहे. आरवलीची शान असलेल्या या गरम पाण्याच्या कुंडांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे त्यांचे बकालीकरण होत असून, थेट त्यांच्या अस्तित्वालाच धोका पोहोचत आहे. या गंभीर बाबीकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामस्थांकडून होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:00 AM 29/May/2025