संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे महिलेच्या क्रूर हत्येचा प्रकार पुढे आला. त्यामुळे पूर्ण गाव हादरले होते. या अमानवी घटनेने संपूर्ण गावात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन कडवईतील २०० महिलांनी दिले आहे.
कडवई येथील बानू फकीर मोहम्मद जुवळे या महिलेचा अत्यंत क्रूरपणे खून झालेला आहे. या घटनेप्रकरणी गावातीलच रिझवान महामूद जुवळे, हुमायू शकील काझी आणि हाजिरा माखजनकर या तिघांवर संशय व्यक्त केला जात आहे. त्या संशयित आरोपींविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, त्यांना जामीन होणार नाही अशा पद्धतीने कारवाई करावी, अशी जोरदार मागणी गावातील महिलांनी व ग्रामस्थांनी केली आहे.
या मागणीसाठी ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले असून, त्या माध्यमातून संगमेश्वर पोलिस ठाण्याला अधिकृत पत्र पाठवण्याची विनंती केली आहे. या निवेदनावर कडवई गावातील सुमारे २०० महिलांनी स्वाक्षरी करून या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. गावातील महिला आणि नागरिकांनी ग्रामपंचायतीकडून ठोस पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे तसेच संपूर्ण प्रकरणात त्वरित न्याय मिळावा, अशी मागणीही केली आहे. गावातील शांतता व सुरक्षिततेसाठी हे अत्यंत आवश्यक असून, पोलिस प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 AM 29/May/2025














