संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गाची दयनीय अवस्था लक्षात घेता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ठेकेदार कंपनीची कानउघाडणी केली. आरवलीपर्यंत रस्त्याची संपूर्ण वाताहत झाली असून, चिखलामुळे अपघातांची संख्या वाढल्याने ठेकेदार म्हात्रे कंपनीच्या अधिकाऱ्यांसह महामार्गाची पाहणी करण्यात आली.
या दौऱ्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष थेराडे यांनी केले. या वेळी म्हात्रे कंपनीचे महाव्यवस्थापक एच. एम. हलशेत उपस्थित होते. विशेष म्हणजे, पूर्वसूचना देऊनही महामार्ग विभागाचा एकही अधिकारी या पाहणीसाठी हजर नव्हता.
पदाधिकाऱ्यांनी रस्त्याच्या दयनीय अवस्थेकडे लक्ष वेधत खराब डायव्हर्शन, चिखलाचे साम्राज्य आणि अपघातांच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली. यावर ठेकेदाराने त्रुटी तातडीने दूर करण्याचे आश्वासन दिले असून, लवकरात लवकर रस्ता सुस्थितीत केला जाईल, असे महाव्यवस्थापक हलशेत यांनी सांगितले. यावेळी तुरळचे सरपंच सहदेव सुवरे, बंड्या बोरूकर, छोट्या गवाणकर, अरविंद जाधव, रामचंद्र हरेकर, दिलीप पेंढारी, प्रकाश घाणेकर आणि नंदकुमार फडकले हे स्थानिक पदाधिकारीही उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 29/May/2025














