रत्नागिरीत वक्फ कार्यालय बंद केले जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार : सकल हिंदू समाज

रत्नागिरी : रत्नागिरीत वक्फ कार्यालय घाई गडबडीने सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाला सकल हिंदू समाजाचा विरोध असून याविरोधात गेल्या आठवड्यात निषेध आंदोलनही करण्यात आले आहे. जोपर्यंत कार्यालय रत्नागिरीतून बंद केले जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे, असे सकल हिंदू समाजाने पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले आहे.

गेल्या आठवड्यात वक्फ कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी सकल हिंदू समाजातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले होते. याबाबत आता सकल हिंदू समाजाने शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी सकल हिंदू समाजाचे चंद्रकांत राहुळ, गणेश गायकवाड, प्रभकार खानविलकर, दीपक जोशी, विजय यादव आदी उपस्थित होते. या आंदोलनाची सुरुवात ४ मार्च २०२४ रोजी झाली होती; मात्र असे असतानासुद्धा याकडे दुर्लक्ष केले गेले, असे सकल हिंदू समाजाचे म्हणणे आहे.

हिंदू लोकप्रतिनिधींनी हिंदूंना गृहीत धरून चालू नये. हिंदू समाजाचे विराट शक्तीचे प्रदर्शन येत्या काळात नक्कीच करण्यात येणार आहे. हिंदूंच्या विरोधात जो कोणी भूमिका घेईल त्याला त्याची जागा दाखवण्यात येईल. देशभरातील वक्फ बोर्डाची जमिनी गिळकृत करण्याचे कारनामे माहीत असताना आताच रत्नागिरीत कार्यालय उभारण्याचे गुपित काय, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

जिल्ह्यातील गावोगावी जाऊन बैठका घेण्याचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीतील वक्फ विभागाचे कार्यालय बंद करावे; अन्यथा येत्या काळात रस्त्यावर हिंदू समाज उतरून आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

रत्नागिरीत लोकमान्य टिळक ग्रंथालयातील शासकीय जागेत अनधिकृत मजार हटवली जात नाही. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानासुद्धा त्याला संरक्षण दिले जाते. त्याचा संरक्षणकर्ता कोण, असा सवाल उपस्थित करण्यात आला. रत्नागिरी मिरकरवाडा किल्ला परिसरातील रस्त्यावरून जाताना हिंदू तरुणांनी जय श्रीराम हा नारा दिल्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या व्यवसायावर बंदी आणली जाते, याबाबत हिंदू समाज आता रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 12/Oct/2024