साडवली : देवरूख आगारातून सकाळी आठ वाजता सुटणारी काटवली, सायले बोरसूत ही फेरी मागील पाच-सहा दिवसांपासून रद्द करण्यात आल्याने प्रवासी आक्रमक झाले आहेत.
सकाळी कामानिमित्त देवरूख येथे येणाऱ्या महिला आणि पुरुष प्रवासी, कॉम्प्युटर क्लाससाठी येणारी मुले, आजारी व्यक्ती, शासकीय दाखले यासाठी खटपट करणाऱ्या पालकांची प्रचंड गैरसोय होत आहे. सकाळची ही फेरी रद्द करण्याचे कारण देताना अधिकाऱ्यांनी गाड्या उपलब्ध नसल्याचे सांगितले. आगार व्यवस्थापकांशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तर त्याला उत्तर दिले जात नाही. इतर अधिकारीसुद्धा टाळाटाळ करतात.
वाहतूक नियंत्रक नलावडे यांच्याशी संपर्क साधला असता ते गाड्या उपलब्ध नाहीत, हाच पाढा वाचतात. उद्यापासून ही फेरी पूर्ववत करण्याबाबत गंभीरपणे व्यवस्थापनाने विचार करावा, अन्यथा सायले काटवली पंचक्रोशीतील एसटी प्रवाशांच्या रोषाला देवरूख आगारातील अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागेल, अशी संतापजनक भूमिका गैरसोयीमुळे त्रस्त महिला, पुरुष प्रवाशांनी घेतली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 29/May/2025














