राजापूर : वारंवार वीजपुरवठा खंडित; महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा पाचल ग्रामस्थांचा इशारा

राजापूर : गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या मॉन्सूनपूर्व पावसामध्ये महावितरण विभागाच्या कारभाराची पुरती पोलखोल झाली आहे. दरदिवशी अनेक गावांमधील वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असल्याने सर्वसामान्य पुरते त्रस्त झाले आहेत. याबाबत पाचल विभागातील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत महावितरण विभागाला भोंगळ कारभाराचा थेट जाब विचारला. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा तातडीने पूर्ववत न झाल्यास पाचल महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही त्यांनी दिला.

महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाचल येथे झालेल्या सभेला पाचलचे सरपंच बाबालाल फरास, उपसरपंच आत्माराम सुतार, तळवडेच्या सरपंच गायत्री साळवी, पांगरीचे अमर जाधव, माजी सरपंच अशोक सक्रे, माजी उपसरपंच किशोर नारकर, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष भास्कर सुतार, माजी पंचायत समिती बाजीराव विश्वासराव, आजिवली सरपंच संजय राणे, सामाजिक महिला कार्यकर्त्या पूजा शिगम, चंदू पवार यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.

मॉन्सूनपूर्व पावसाच्या तडाख्यामध्ये तालुक्यातील अनेक गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यापैकी काही गावांमधील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरण विभागारला यश आले असले, तरी काही गावे अद्यापही अंधारात राहिलेली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.

पाचल येथील ग्रामस्थांनी महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत थेट जाब विचारला आहे. पावसाळ्यापूर्वी वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी महावितरण अधिकाऱ्यांकडून नियोजन केल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा पाहता महावितरण विभागाने त्याबाबत कोणतेही नियोजन केले नसल्याचा आरोप करत पाचल येथील ग्रामस्थांनी महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आम्हाला अडचणी सांगू नका तर आम्हाला सेवा या अन्यथा पाचल महावितरण कार्यालयाला टाळे ठोकू, असा खरमरीत इशाराही ग्रामस्थांसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी दिला.

वीजपुरवठा सुरळीत करणार…
वारंवार खंडित वीजपुरवठ्याबाबत पाचल ग्रामस्थांनी घेतलेला आक्रमक पवित्रा पाहून महावितरण अधिकाऱ्यांनी पाचल विभागातील वीजपुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही ग्रामस्थांना दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 29/May/2025