रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना काल जयंतीनिमित्त रत्नागिरीकरांनी अभिवादन केले. शहरातील लक्ष्मीचौक येथील सावरकरांच्या पुतळ्याला सावरकरप्रेमींनी अभिवादन केले. तसेच शहराजवळील शिरगाव येथील दामले यांच्या निवासस्थानी वीर सावरकरांचे वास्तव्य असलेल्या जतन करून ठेवलेल्या खोलीलाही अनेकांनी भेट दिली. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, नूतन पोलिस अधीक्षक बगाटे यांनीही शिरगावला भेट देऊन अभिवादन केले.

लक्ष्मीचौक येथे काल सावरकरांच्या पुतळ्याला विविध संस्था, संघटनांनी अभिवादन केले. सकाळी आमदार डावखरे यांनीही पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी शिरगाव येथील दामले यांच्या निवासस्थानी भेट दिली. येथे दामले कुटुंबीयांच्या चौथ्या-पाचव्या पिढीने वीर सावरकर वास्तव्यास असलेल्या खोलीचे १०० वर्षे जतन करून ठेवले आहे. या ठिकाणी शैला दामले, रवींद्र दामले, प्रसन्न दामले व कुटुंबीयांनी आमदार व पोलिस अधीक्षकांचे स्वागत केले. ही खोली कशा प्रकारे जतन करून ठेवली, या घरातील सावरकरांची भेट, बास्तव्य या संदर्भात ऐतिहासिक माहितीसुद्धा दिली.

मिऱ्या-नागपूर महामार्गावर उद्यमनगर येथून शिरगावकडे जाणारा मार्ग दामले यांच्या या निवासस्थानाजवळून जातो. बऱ्याच वर्षांपूर्वी मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याचे नामकरणही केले होते. या रस्त्याला वीर सावरकरांच्या नावाची कमान उभारण्याची मागणी दामले कुटुंबीयांनी आमदार डावखरे यांच्याकडे केली. याला सकारात्मक प्रतिसाद देऊन जिल्हा नियोजनमधून प्रयत्न करूया, असे आश्वासन डावखरे यांनी दिले. या प्रसंगी भाजपचे पदवीधर मंच संयोजक मनोज पाटणकर, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, विवेक सुर्वे, उमेश देसाई, उमेश खंडकर, स्नेहा चव्हाण, पुरुषोत्तम मयेकर, मंदार खंडकर, पोलिस पाटील पूजा शिंदे आणि संतोष सावंत, सनगरे, विक्रांत कदम आदी उपस्थित होते.

वीर सावरकर हे नाव बालपणापासून क्रांतिकारी चळवळीसारखे माझ्या विचारांमध्ये कोरले गेले. दामले कुटुंबीयांनी जतन केलेल्या खोलीमध्ये सावरकरांच्या प्रतिमेस नमन करून आशीर्वाद घेतले. हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. दामले कुटुंबीयांचे आभार. त्यांनी ज्वलंत इतिहास आजही जिवंत ठेवला आहे. वीर सावरकरांना कोटी कोटी नमन- नितीन बगाटे, पोलिस अधीक्षक

स्वातंत्र्यवीर सावरकरर्जीचा शिरगावातील दामले यांच्या घरी निवास होता. आज तिथे भेट देण्याचे भाग्य मला लाभले. हे एक ऊर्जास्थान आहे. राष्ट्रकार्याची प्रेरणा घेण्याचे हे स्थान आहे- आमदार निरंजन डावखरे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 29/May/2025