रत्नदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम : ८०० दारूच्या बाटल्यांचा खच हटवला!

रत्नागिरी, २९ मे २०२५: महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेले गडकिल्ले स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने गडकिल्ले संवर्धन संस्था, महाराष्ट्र राज्य, कोकण विभाग नेहमीच अग्रेसर असते. याच भावनेतून मंगळवार, २७ मे रोजी रत्नागिरी येथील ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्ल्यावर भव्य स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत धक्कादायकपणे सुमारे ८०० दारूच्या बाटल्या आणि प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच जमा करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले हे गडकिल्ले आपल्याला शक्ती आणि ऊर्जा देतात. त्यांचे जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. मात्र, दुर्दैवाने अनेक ठिकाणी मद्यपी आणि बेजबाबदार पर्यटकांमुळे किल्ल्यांवर दारूच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या आणि इतर कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जातो. यामुळे आपल्या या ऐतिहासिक वारशाचे मोठे नुकसान होत आहे आणि किल्ल्यांचा परिसर अस्वच्छ होत आहे.

श्री. दिपेश वारंग यांच्या प्रमुख नेतृत्वाखालील या स्वच्छता मोहिमेत, गडकिल्ले संवर्धन संस्थेचे सुमारे ३० दुर्गसेवक आणि दुर्गसेविका सहभागी झाले होते. यामध्ये अनिकेत वाडकर, प्रणव सिनकर, शुभम आग्रे, साहिल जाधव, मंथन पाडावे, मयूर भितळे, समुर्द्वी चाळके, मानसी चव्हाण, सेजल मेस्त्री, खुशी गोताड, ओमकार सावंतदेसाई, सौरभ बळकटे, तन्मय जाधव, अर्थव रसाळ, प्रीतम मांडवकर, रश्मी जाधव, श्वेता भितळे यांचा समावेश होता.

पुढील पिढीला आपल्या गडकिल्ल्यांचा इतिहास कळावा आणि त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने गडकिल्ले संवर्धन संस्था सातत्याने असे उपक्रम राबवत आहे. या मोहिमेमुळे रत्नदुर्ग किल्ल्याच्या सौंदर्यात भर पडली असून, स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 29-05-2025