रत्नागिरी, २९ मे २०२५ : उन्हाळी सुट्ट्या, मैत्रीचे घट्ट धागे आणि कोकणची निसर्गरम्यता यांचा सुरेख संगम असलेला ‘एप्रिल-मे ९९’ हा चित्रपट सध्या संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे. याच चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक, कोकणचे सुपुत्र रोहन मापुस्कर आणि चित्रपटातील अभिनेत्री जाई अर्थात साजिरी जोशी आज रत्नागिरीत येत आहेत.
आज सायंकाळी सव्वा पाच वाजता रत्नागिरीतील सिटी प्राईड सिनेमागृह येथे ‘एप्रिल-मे ९९’च्या शोला रोहन मापुस्कर आणि साजिरी जोशी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबतच या चित्रपटातील स्थानिक कलाकार अमोल रेडीज, सचिन काळे, योगेश बांडागळे, सुमंत केळकर, संचिता जोशी, स्मितल चव्हाण आणि अक्षता कांबळी हे देखील उपस्थित राहून रसिकांना भेटणार आहेत.
चित्रपटात काम केलेल्या स्थानिक कलाकारांनी रत्नागिरीकर रसिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी या सिनेमाला उपस्थित राहावे आणि दिग्दर्शक व अभिनेत्री यांच्यासोबत या कोकणात चित्रित झालेल्या चित्रपटाचा आनंद घ्यावा. हा चित्रपट कोकणातील प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे, कारण यामध्ये त्यांना आपल्या परिसराचे सुंदर चित्रण मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 29-05-2025














