मंडणगड : कुंभार्लीचे आंदोलन लेखी आश्वासनानंतर स्थगित

मंडणगड : तालुक्यातील कुंभार्ली गावाच्या पाणीप्रश्नासंदर्भात जलजीवनअंतर्गत बांधण्यात आलेल्या दूषित पाण्याच्या विहिरीला पर्यायी नवीन विहीर बांधून देण्याची मागणी करत कुंभार्लीच्या ग्रामस्थांनी बुधवारी (ता. २८) मंडणगड पंचायत समितीसमोर जोरदार आंदोलन केले. पंधरा दिवसाच्या आत नवीन विहिरीचे काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व मनसेचे प्रदेश सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी केले.

या संदर्भात आंदोलनस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कुंभार्ली गावाची नळपाणी योजनेच्या बांधलेल्या विहिरीचे पाणी दूषित असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यासाठी मागील आठ महिन्यात अनेकवेळा पाणीपुरवठा विभाग, मंडणगड यांच्याकडे पाठपुरावा करून देखील प्रशासनाच्या वतीने कोणतीही कार्यवाही केली नाही. विहिरीचे पाणी दूषित असल्याचे अहवाल प्रशासनाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागानेही दिला आहे; मात्र पाणीपुरवठा विभाग कागदपत्रांचे सोपस्काराचे कारण पुढे करत या विषयासंदर्भात वेळकाढू धोरण राबवत असल्याने ग्रामस्थ महिलांनी अखेर आंदोलन छेडले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

पंचायत समिती आवारात निषेधाचे बॅनर घेऊन प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. यानंतर वैभव खेडेकर यांच्यासह ग्रामस्थांची गटविकास अधिकारी यांच्या दालनात झालेल्या बैठकीत आंदोलनकर्त्यांची नवीन विहिरीची मागणी प्रशासनाने मान्य केली. खेडेकर यांनी झालेली दिई आणि कार्यपद्धतीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना खडेबोल सुनवले.

यानंतर पंधरा दिवसाच्या आत विहिरीचे काम सुरू करणार असल्याचे आश्वासन या वेळी प्रशासनाच्यावतीने पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंता कविता जवादे यांनी दिले. यानंतर पंचायत समितीच्या आवारातील आंदोलनकर्त्या सर्वांसमोर ग्रामस्थ प्रतिनिधींना या आशयाचे अधिकृत लेखी पत्र उपअभियंता कविता जवादे यांनी सुपूर्द केले. या वेळी गटविकास अधिकारी विशाल जाधव, पोलिस निरीक्षक नितीन गवारे, मनसेचे प्रदेश सचिव वैभव खेडेकर, कुम्भार्लीचे ग्रामस्थ सचिन संवादकर, संतोष कलमकर, मारूती म्हाप्रळकर, आनंद कळमकर, राकेश म्हाप्रळकर, अशोक चिपळूणकर, रंजना म्हाप्रळकर आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 AM 29/May/2025