लांजा, २९ मे २०२५ : मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा शहरातील रस्त्यांची झालेली दुर्दशा, चिखलाचे साम्राज्य आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी या गंभीर समस्येवर आवाज उठवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) आक्रमक झाली आहे. पक्षाने याबाबत तहसीलदार कार्यालयात निवेदन देऊन तातडीने बैठक बोलावण्याची मागणी केली होती, त्यानुसार बुधवारी, २८ मे रोजी लांजा तहसीलदार यांनी ही बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत शिवसैनिकांनी महामार्गाच्या कामाबाबत ठेकेदाराच्या चुकीच्या कामाचा पाढा वाचला. विशेषतः पावसाळ्याच्या तोंडावर काम सुरू केल्याने ही भयानक परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. शिवसैनिकांनी महामार्ग अधिकारी आणि ठेकेदाराला चांगलेच धारेवर धरत अक्षरशः घाम फोडला.
सर्व्हिस रोडच्या कामाची जोरदार मागणी :
जोपर्यंत सर्व्हिस रोडचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत महामार्गाचे काम सुरू करू नये, अशी जोरदार मागणी शिवसैनिकांनी लावून धरली. शहराची रस्त्यांमुळे झालेली दयनीय अवस्था पाहता, नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. त्यामुळे आधी सर्व्हिस रोडचे काम हाती घ्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
तहसीलदारांनाही धारेवर धरले :
बैठकीत महामार्ग अधिकारी आणि ठेकेदाराला धारेवर धरल्यानंतर, तहसीलदारांनी मात्र आपण वेळोवेळी पत्रव्यवहार करून संबंधित कार्यालयांना माहिती दिली असून, आता महामार्ग अधिकाऱ्यांशी बोलावे, असे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. यावर संतप्त शिवसैनिकांनी, “आपण लांजा तालुक्याचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी आहात आणि सध्याच्या परिस्थितीची आपल्याला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे आपण आपली जबाबदारी झटकू शकत नाही, आपण यावर आदेश देऊ शकता,” असे ठणकावून सांगितले. यानंतर तहसीलदारांनी संबंधित महामार्ग अधिकारी आणि ठेकेदाराला तातडीने उपाययोजना करण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा करण्यास सांगितले.
दोन दिवसांत उपाययोजनेचे आश्वासन, मगच शिवसैनिक शांत :
शेवटी, महामार्ग अधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर येत्या दोन दिवसांत पाऊस थांबल्यास सर्व्हिस रोडचे काम तातडीने पूर्ण केले जाईल, तसेच महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम थांबवून रस्त्यालगतचे लोखंडी खांब ताबडतोब हटवले जातील, असे आश्वासन दिले. राम पुलाजवळ सुरू असलेले काम २४ तासांत पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतरच शिवसैनिक शांत झाले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता कदम, जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस, परवेश घारे, तालुकाप्रमुख सुरेश करंबेळे, महिला तालुकाप्रमुख पूर्वा मुळे, अभिजीत राजेशिर्के, प्रकाश लांजेकर, दिलीप मुजावर, चंद्रकांत शिंदे, श्रीकृष्ण हेगिष्टे, नितीन शेट्ये, सचिन लिंगायत, मोहन तोडकरी, चंद्रशेखर धावणे, दाजी गडहिरे यांच्यासह अनेक शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 29-05-2025














