रत्नागिरी, २९ मे २०२५ : महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचे प्रतीक असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने, रत्नागिरी भाजप महिला मोर्चाने एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. रत्नागिरी तालुक्यातील पावस येथे महाराष्ट्र शासन व इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून नोंदणीकृत महिला कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. महिला कामगारांसाठी हा उपक्रम खऱ्या अर्थाने आधारवड ठरला आहे.
या उपक्रमाचे यशस्वी आयोजन सौ. वर्षा ढेकणे (जिल्हा अध्यक्ष, महिला मोर्चा), सुशांत पाटकर (माजी पंचायत समिती सदस्य), दादा दळी (तालुका अध्यक्ष) आणि सौ. प्रियल जोशी (तालुका अध्यक्ष) यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
या कार्यक्रमाला भाजपच्या इतर पदाधिकाऱ्यांचेही मोलाचे योगदान लाभले. यामध्ये सौ. प्रज्ञा शिवगण, सौ. दिक्षा गजने, कांचन भातडे, अजय पानगले, राजेश पाथरे यांचा समावेश होता. तसेच रत्नागिरी शहराध्यक्ष दादा ढेकणे यांचीही याप्रसंगी उपस्थिती होती.
या कार्यक्रमात केवळ उपयुक्त वस्तूंचे वाटपच करण्यात आले नाही, तर शासनाच्या विविध योजनांची माहितीही महिलांना देण्यात आली. याशिवाय, उपस्थित मान्यवरांनी महिलांशी प्रेरणादायी संवाद साधून त्यांना प्रोत्साहन दिले. या उपक्रमामुळे महिला कामगारांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 29-05-2025














