भारतात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसमुळे चिंता वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे एक्टिव्ह रुग्ण १२०० च्या पुढे गेले आहेत. याच दरम्यान १२ जणांचा मृत्यू झाला आहे.
विशेषतः केरळ, महाराष्ट्र आणि दिल्लीसारख्या राज्यांमध्ये रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, वातावरणातील बदल आणि रोग प्रतिकारकशक्ती कमी होणं ही याची प्रमुख कारणं असू शकतात. बहुतेक प्रकरणांमध्ये लक्षणं सौम्य असतात आणि रुग्ण घरीच बरे होत आहेत.
आरोग्य मंत्रालयाने राज्यांना खबरदारीची आणि रुग्णालयांमध्ये आयसीयू बेड, ऑक्सिजन पुरवठा आणि इतर आवश्यक संसाधनांची तयारी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. केरळमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे, जिथे मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रसारख्या मोठ्या शहरांमध्येही नवीन रुग्ण वाढत आहेत, ज्यामुळे आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे.
“परिस्थिती नियंत्रणात, मात्र सावधगिरी बाळगणं आवश्यक”
NB.1.8.1 आणि LF.7 सारखे नवीन व्हेरिएंट आढळून आले आहेत, परंतु जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि भारतीय आरोग्य संस्थांनुसार, हे व्हेरिएंट मागील ओमायक्रॉन व्हेरिएंटपेक्षा जास्त संसर्गजन्य किंवा गंभीर नाहीत. दिल्ली एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिलेलया माहितीनुसार “२०२३ मध्ये दिसणारा नवीन व्हेरिएंट JN.1 आता जागतिक स्तरावर प्रमुख आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे, मात्र सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.”
खबरदारी आणि प्रतिबंधात्मक उपाय
आरोग्य मंत्रालयाने लोकांना मास्क घालण्याचा, सोशल डिस्टन्स ठेवण्याचा आणि वारंवार हात धुण्याचा सल्ला दिला आहे. ज्या लोकांनी बराच काळ बूस्टर डोस घेतला नाही त्यांनी लस घेण्याचा विचार करावा असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
केंद्र सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. DGHS, NCDC आणि ICMR सारख्या संस्था सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. नवीन व्हेरिएंटवर लक्ष ठेवण्यासाठी टेस्ट आणि जीनोम सिक्वेन्सिंग वाढवण्याच्या सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की, घाबरण्याची गरज नाही, परंतु सावधगिरी बाळगणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 29-05-2025














