रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरून दुचाकी, चारचाकी, बसेस, खासगी गाड्या हातखंबा, लांजा, राजापूर, मालवणाला जात असतात. या मार्गावर मोठी वर्दळ असते. आधीच अर्धवट कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या येत आहे.
दुसरीकडे ऐन पावसाळ्यात गाडी घसरून किरकोळ अपघात होत आहेत. अशातच आता राष्ट्रीय महामार्गावर मोकाट जनावरे, भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे वेगाने आलेल्या गाड्यांना अडसर होत असून, अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा मोकाट जनावरे, कुत्र्यांवर कारवाई करावी, अशी मागणी वाहनधारकांमधून करण्यात येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील कामे मागील १६ वर्षांपासून सुरूच आहेत. त्यामुळे लांजा, राजापूर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या दरम्यानचा प्रवास मोठ्या प्रमाणात होत असतो. आधीच पावसाने अक्षरक्षः रत्नागिरी जिल्हा झोडपल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यांची वाट लागली आहे.
त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दुसरीकडे आता ऐन पावसाळ्यात महामार्गावर गाय, बैल, कुत्र्यांचा वावर वाढला आहे. रस्त्यांच्या मधोमध ही जनावरे ठाण मांडून बसलेली असतात. अशावेळी जर महामार्गावर गाड्यांचा वेग ८० ते १०० किमी असला तर अचानक मोकाट जनावरे, कुत्रे मध्ये आल्याच चालकाचा ताबा सुटून अपघात घडतात.
दररोज वडापने, बस, रिक्षा, चारचाकीने प्रवास करणाऱ्यांना या मोकाट जानावरे, कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. अशा मोकाट जनावरे, कुत्र्यांना पकडावे अन्यथा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्गावर जनावरे कळप करून फिरतात तसेच ठाण मांडून रस्ता अडवतात. बसलेल्या कळपाच्या बाजूने वळसा मारून मोठ्या वाहनांना जावे लागते. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. रात्रीच्यावेळी ही जानावरे रस्त्यात बसलेली दिसून येतात. रस्त्यात बसलेली जनावरे रात्रीच्या अंधारात काहीवेळेला वाहनचालकांना दिसून येत नाहीत. जनावरांना वाचवण्याच्या नादात अनेकवेळा अपघात होतात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 PM 29/May/2025














