रत्नागिरी : रत्नागिरी शहरात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी रत्नागिरी नगरपालिकेने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. पालिकेने कुत्र्यांच्या नसबंदी आणि लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला असून, गेल्या दोन महिन्यांत १५ दिवसांच्या टप्प्यात तब्बल ९६० कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.
या कामासाठी पालिकेने सुमारे १५ लाख १४ हजार रुपये खर्च केले आहेत. यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांच्या उत्पत्तीवर नियंत्रण येऊन त्यांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच, लसीकरणामुळे कुत्री पिसाळण्याचे प्रमाणही लक्षणीयरीत्या कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
शहरातील कुत्र्यांची वाढती दहशत :
रत्नागिरी शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. टोळक्याने फिरणारी ही कुत्री रस्त्यांवर आणि नाक्यानाक्यांवर दिसतात. दुचाकी किंवा चारचाकी वाहनांचा पाठलाग करणे, रात्री-अपरात्री बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर हल्ला करण्याची भीती निर्माण करणे, यामुळे शहरात एकप्रकारे कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी याच दहशतीमुळे कुत्र्यांवर विषप्रयोग झाल्याची घटनाही घडली होती, जी कायद्याने गुन्हा आहे.
नसबंदी हाच उपाय :
कुत्र्यांची हत्या करणे हा कायद्याने गुन्हा असल्याने, नसबंदी करून त्यांची उत्पत्ती रोखणे हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. हे लक्षात घेऊन पालिकेने कुत्र्यांची दहशत कमी करण्यासाठी नसबंदी आणि लसीकरण हे दोन्ही उपाय अवलंबले आहेत.
पालिकेने यासाठी कोल्हापूरच्या सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन एजन्सीला नसबंदीचा ठेका दिला आहे. प्रत्येक कुत्र्याच्या शस्त्रक्रियेसाठी ही एजन्सी १६५० रुपये घेते. एप्रिल महिन्यात या एजन्सीने १५ दिवसांमध्ये २१३ नर आणि २३२ मादी असे एकूण ४४५ कुत्र्यांची नसबंदी व लसीकरण केले. तर १ ते १५ मे या कालावधीत २५६ नर आणि २५८ मादी असे ५१५ कुत्र्यांची नसबंदी व लसीकरण करण्यात आले.
या उपक्रमामुळे रत्नागिरीतील नागरिकांना भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवापासून लवकरच दिलासा मिळेल, अशी आशा आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 29-05-2025














