रत्नागिरी : यवतमाळ शहर पोलिस ठाण्यातील अधिकारी असल्याची बतावणी करून रत्नागिरीतील एका मंगल कार्यालयाच्या मालकाला अटकेची भीती दाखवून पैसे उकळणाऱ्या आरोपीला गडचिरोली येथून अटक करण्यात आली. या मंगल कार्यालयाच्या हॉलमध्ये दोन वर्षांपूर्वी सहा मुलं आणि मुली राहिल्या होत्या. त्यांच्याकडून असभ्य कृत्य झाले असल्याची तक्रार दाखल झाली असून त्यात आरोपी केले जाऊ नये यासाठी अटक केलेल्या तोतया पोलिस अधिकाऱ्याने वारंवार पैसे मागून धमकावल्याची तक्रार शहर पोलिसांकडे करण्यात आली होती.
शहरातील परटवणे-गांजुर्डे मार्गावर ओंकार मंगल कार्यालय आहे. याठिकाणी विवाह कार्यासाठी येणाऱ्यांना राहण्याचीही सोय आहे. याच ठिकाणी दोन वर्षांपूर्वी सहा मुलं-मुली राहिली होती. त्यांचे असभ्य अवस्थेतील चित्रिकरण करण्यात आले असून त्याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल होत आहे. ही केस मिटवण्यासाठी ३० हजार रुपये देण्याची मागणी आरोपी चंदन दिगुराम सांगरे (वय २८, रा. ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) याने मोबाईलवरून फोन करून मंगल कार्यालय मालकाच्या मुलाकडे पैशाची मागणी केली.
जून महिन्यात पैशाची मागणी करून अटकेची भीती दाखवण्यात आल्यानंतर दोन वेळा पंधरा हजार रुपयांप्रमाणे ३० हजार रुपये आरोपीने दिलेल्या मोबाईल नंबरवर गुगल पे करण्यात आले. आरोपीला पैशाची चटक लागल्यानंतर त्याने पुन्हा मंगल कार्यालय मालकाच्या मुलाच्या मोबाईलवर फोन करून आणखी पैसे मागण्यास सुरूवात केली. अखेर शहर पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक पृथ्वीराज देसाई, कॉ. किरण डांगे यांनी आरोपी चंदन सांगरे याने केलेल्या मोबाईल नंबरवरून माग काढत त्याला अटक केली.
आरोपीला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी
आरोपी चंदन सांगरे याच्यावर गोंदिया येथे अशाच गुन्ह्यांची नोंद आहे. हा आरोपी उच्च शिक्षित असून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर त्याला न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 PM 12/Oct/2024














