रत्नागिरी : मान्सून पूर्व पावसाचा जोर तब्बल दहा-बारा दिवसांनंतर ओसरला. बुधवारी काही भागांत सूर्यदर्शन झाल्याने, नागरिकांनीही सुटकेचा निःश्वास टाकला. जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाच्या तडाख्याने जवळपास पन्नास लाखांचे नुकसान झाले आहे. गुरुवारीही जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
गेले दहा ते बारा दिवस अरवी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दावाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीला पावसाने झोडपून काढले. नद्या-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे पडून, घरांचे गोठ्यांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत दोन व्यक्तींना प्राण गमवावे लागले. यातील एका व्यक्तीचा मृत्यू वीज पडून लांजा तालुक्यात झाला, तर दापोलीत एकाचा पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला. पूरसदृश स्थितीमुळे काही भागांत रस्तेही वाहून गेले.
या मान्सूनपूर्व पावसाचा फटका बसून जिल्ह्यात गेल्या दहा-बारा दिवसांत तब्बल ५० लाखांचे नुकसान नोंदवले गेले आहे. बुधवारी पावसाने विश्रांती घेतल्याने, सूर्यदर्शनही काही भागांत झाले. दुपारनंतर मात्र वातावरण काहीसे ढगाळ होते. गुरुवारीही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. दरम्यान, पावसामुळे लांजामध्ये पेंटिंग काम करणाऱ्या एक तरुणाला गोंडेसखल रोड येथे ओला बांबू हायटेंशन वायरला लागल्याने शॉक लागला. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संगमेश्वर तालुक्यात धामणी कांबळेवाडी येथे बौध्दविहारावर झाड कोसळून ४५ हजाराचे नुकसान झाले. राजापूर तालुक्यातील पन्हळेतर्फे सौंदळ येथील सुनील मोरे घराशेजारी संरक्षक भिंत कोसळून ६० हजारांचे नुकसान झाले. धामणपे येथे तानवडे यांची संरक्षक भिंत कोसळून ५० हजाराचे नुकसान झाले. दापोली येथे करंजाणी येथे सुलोचना कालेकर यांच्या घरावर व गोठ्यावर झाडाची फांदी पडून ५० हजाराचे नुकसान, खेर्डी येथे गंगाराम भुवड यांच्या गोठ्याचे ७५ हजाराचे नुकसान, मुरुड कर्दे येथे सुमती दुबळे यांच्या घराची संरक्षक भिंत कोसळून १ लाख ३३ हजाराचे नुकसान, शिवाजीनगर येथे रघुनाथ महाडिक यांच्या येथील सार्वजनिक विहीर कोसळून आठ लाखाचे नुकसान, खेडी येथील संतोष भूवड यांचा गोठा कोसळून ८० हजार, लाडघर करंजगाव येथील प्रफुल्ल मोरे यांच्या गोठ्याचे ३५ हजार, निगडी येथे जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षक भिंतीचे ७५ हजार, पणदेरी येथे पुष्पा नवाल यांच्या घराचे ५० हजार, मधूकर पावशे यांच्या घराचे ५० हजार, वैशाली पोवार यांच्या घराचे ३० हजार, हर्णे येथील फकीर महंमद मजगावकर यांच्या घराचे ३५ हजार, काशी कुलबावकर यांच्या घराचे ३० हजारे, जयश्री कुलबावकर यांच्या घराचे २५ हजार, हर्णे येथील सईदा अलवी यांच्या घराचे दोन लाख, पणदेरी येथील दिलीप नवार यांच्या दुकानाचे ५० हजार, भोपण येथील शंकर पालशेतकर यांच्या घराची संरक्षक भिंत कोसळून दीड लाख, अशोक आंबेकर यांच्या घराचे साठ हजार, वावघर भांगणेवाडी येथे रामचंद्र आग्रे यांच्या नवीन घराचे बांधाकाम सुरु असताना भिंत कोसळून ८० हजाराचे नुकसान झाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 29-05-2025














