रत्नागिरी पोलीस दलातर्फे ‘सामाजिक सलोखा समिती’

रत्नागिरी : जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून नितीन बगाटे यांनी गेल्या आठवड्यात पदभार स्वीकारल्यानंतर एकीकडे जिल्ह्याचा आढावा घेतानाच दुसरीकडे लागलीच अॅक्शन मोड अॅक्टिव्हेट केला आहे. जिल्ह्यामध्ये सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्व पोलीस ठाणे स्तरावर “सामाजिक सलोखा समिती” स्थापन करण्याबाबत त्यांनी २८ मे रोजी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून निर्देशित केले आहे.

या सामाजिक सलोखा समितीची ठळक वैशिष्ट्ये अशी असतील

१) या समितीमध्ये सर्व पोलीस ठाणे हद्दीतील सामाजिक कार्यकर्ते, राजकिय व्यक्ती, तसेच सर्व जाती धर्मातील धर्मगुरु, आणि प्रतिष्ठीत व्यक्ती यांचा समावेश असणार.
२) या समितीमार्फत यापुढे सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये साजरे होणारे सर्व धार्मिक सण व उत्सव यांच्या अनुषंगाने वेळोवेळी बैठका घेण्यात येणार.
३) कोणत्याही धार्मिक सण व उत्सव याबाबत काही समस्या असल्यास त्यांची लागलीच पोलीस ठाणे स्तरावर पूर्तता करण्यात येणार.
४) या समिती मधील सर्व सदस्यांना संबंधित पोलिस ठाण्यांमधील पोलिस अधिकारी तसेच बीट अंमलदार यांचे संपर्क क्रमांक देण्यात येणार.
५) या समितीमार्फत धार्मिक सण व उत्सवाच्या अनुषंगाने त्या-त्या वेळी कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात येणार.
६) या “सामाजिक सलोखा समिती” चे कामकाज पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणार असून, काही महत्त्वाच्या बैठकींना ते स्वतः व अपर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड या उपस्थित राहणार.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:24 PM 29/May/2025