राजापूर शहरातील वरचीपेठ भागात दिवसाढवळ्या पथदिवे सुरू

राजापूर : राजापूर नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराचा फटका शहरातील नागरिकांना बसत आहे. शहरातील वरचीपेठ भागात दिवसाढवळ्या पथदिवे सुरू असतात, तर रात्रीच्या वेळी मात्र हे दिवे बंद असल्याने सर्वत्र अंधार पसरलेला असतो. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, नगर परिषदेच्या ढिसाळ कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवसा पथदिवे सुरू असल्याने विजेचा मोठा अपव्यय होत आहे. याउलट, रात्रीच्या वेळी जेव्हा दिव्यांची खरी गरज असते, तेव्हा ते बंद असल्याने नागरिकांना काळोखातूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. विशेष म्हणजे, या पथदिव्यांसाठी नागरिकांकडून कर वसूल केला जात असून, कोणताही फायदा नसताना भुर्दंड सोसावा लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

अधिक चौकशी केली असता, पथदिवे टायमरवर लावण्यात आल्याचे आणि तांत्रिक बिघाडामुळे दिवसाही दिवे सुरू राहत असल्याचे नगर परिषदेकडून सांगण्यात आले. मात्र, हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. दिवसभर दिवे सुरू असतानाही दुरुस्तीची कोणतीही कार्यवाही केली जात नाही. नगर परिषदेला याकडे लक्ष द्यायला वेळच नसल्याचे चित्र आहे. यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना चाचपडत जावे लागत असून, अपघाताची भीतीही वाढली आहे. विजेचा अपव्यय आणि नागरिकांची गैरसोय यामुळे राजापूर नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:32 PM 29/May/2025