दापोली : किरकोळ वादातून एका व्यक्तीने दुसऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना दापोली तालुक्यातील साकुर्डे येथे घडली आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात एकाविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१), ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मारुती शांताराम सकपाळ (वय ४३, व्यवसाय चिरेखाण व दुकान, रा. कुंभारखाणवाडी साकुर्डे, ता. दापोली) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, बुधवार, दिनांक २८ मे २०२५ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मारुती सकपाळ हे कुंभारखाण साकुर्डे येथील आपल्या दुकानात होते. त्यावेळी आरोपी अशोक शांताराम सकपाळ (रा. साकुर्डे कुंभारखाण, ता. दापोली) याने त्यांना शिवीगाळ केली आणि घरी निघून गेला.
या शिवीगाळीबाबत विचारणा करण्यासाठी मारुती सकपाळ हे अशोक सकपाळच्या घरी गेले. याचा राग मनात धरून आरोपी अशोकने पडवीत असलेली कुन्हाड मारुती सकपाळ यांच्या दिशेने फेकली, जी त्यांच्या खांद्याला लागली. त्यानंतर दोघांमध्ये भांडण सुरू झाले. अमोल शिरगावकर आणि राम शिरगावकर भांडण सोडवण्यासाठी आले असता, आरोपी अशोकने दुसरी कुन्हाड घेऊन मारुती सकपाळ यांच्या उजव्या दंडावर मारून त्यांना जखमी केले.
या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात दिनांक २९ मे २०२५ रोजी पहाटे ३ वाजून १३ मिनिटांनी करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस फौजदार/११३५ प्रकाश सीताराम मोरे, दापोली पोलीस ठाणे हे करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:48 PM 29/May/2025














