साखरपा, २९ मे २०२५: गेल्या दोन रात्रींपासून साखरपा पंचक्रोशीतील ग्रामस्थांना अनियमित विद्युतपुरवठ्याने अक्षरशः हैराण करून सोडले आहे. मेढे, दाभोळे, कनकाडी या गावांमध्ये सातत्याने वीज खंडित होण्याच्या प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
रविवारी रात्री काही वेळा वीजपुरवठा खंडित झाला, तर सोमवारी रात्री तब्बल सहावेळा वीज गेली. विशेष म्हणजे, प्रत्येकवेळी वीज खंडित झाल्यावर ती नेमकी दहा ते पंधरा मिनिटांनी पूर्ववत होत असल्याचा अनुभव ग्रामस्थांना येत आहे. या अनियमित आणि त्रासदायक प्रकारामुळे ग्रामस्थांनी काही
गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत:
वीजपुरवठा नेमका रात्री १० ते सकाळी ७ याच वेळेत खंडित कसा होतो? दिवसा कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येत नाही, मग रात्रीच असे का घडते?
प्रत्येकवेळी वीज नेमकी १० ते १५ मिनिटांसाठीच खंडित का होते? हा प्रकार योगायोग आहे की यात काही तांत्रिक बिघाड आहे?
दिवसभरात कोणताही दोष कसा निर्माण होत नाही?
या प्रश्नांची उत्तरे महावितरणकडून मिळावीत, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून, विशेषतः विद्यार्थ्यांना अभ्यासात आणि ज्येष्ठ नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. महावितरणने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी अपेक्षा साखरपा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:34 29-05-2025














