‘ऑपरेशन सिंदूर’ अजून संपलेले नाही…; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा

PM Modi Bengal visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार येथे कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी केली. यावेळी जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला.

‘पाकिस्तानने हे समजून घ्यावे की, आम्ही तीन वेळा घुसून हल्ला केला आहे. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही,’ असे पीएम मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणतात, ’22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर कृत्यानंतर देशभरात खूप संताप होता. आमच्या माता-बहिणींचे सिंदूर पुसण्याचे धाडस केले. पण, आपल्या सैन्याने त्यांना सिंदूरची ताकद दाखवून दिली. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने जगाला सांगितले की, जर भारतावर दहशतवादी हल्ला झाला, तर शत्रूला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल.’

‘पाकिस्तानने हे समजून घ्यावे की, आम्ही तीन वेळा त्यांच्या घरात घुसून हल्ला केला आहे. आम्ही शक्तीची पूजा करतो. आम्ही दहशतवादाचे अड्डे नष्ट केले, ज्याची पाकिस्तानने कल्पनाही केली नव्हती. पाकिस्तानकडे दहशतवादाशिवाय काहीही नाही. पाकिस्तानने फक्त दहशतवादाला पोसले आहे. जेव्हा थेट युद्ध होते, तेव्हा पाकिस्तानचा पराभव निश्चित असतो. हेच कारण आहे की पाकिस्तानी सैन्य दहशतवाद्यांची मदत घेते,’ अशी टीका पंतप्रधानांनी केली.

कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी
‘आज जेव्हा भारत ‘विकसित राष्ट्र’कडे वाटचाल करत आहे, तेव्हा बंगालचा सहभाग अपेक्षित आणि आवश्यक आहे. या उद्देशाने, केंद्र सरकार येथे पायाभूत सुविधा, नवोपक्रम आणि गुंतवणुकीला सतत नवीन चालना देत आहे. बंगालचा विकास हा भारताच्या भविष्याचा पाया आहे. आज त्या पायावर आणखी एक मजबूत वीट जोडण्याचा दिवस आहे,’ अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:50 29-05-2025