कंत्राटी शिक्षक भरतीत स्थानिकच : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : कंत्राटी शिक्षकांना दोन दिवसांत नियुक्त्या मिळतील तसे आदेश जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत. या भरतीत स्थानिकच डीएड, बीएडधारक बेरोजगार असतील, असे प्रतिपादन पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कंत्राटी शिक्षक मेळाव्यात केले.

माळनाक्यातील मराठा भवन येथे शुक्रवारी कंत्राटी शिक्षक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उदय सामंत बोलत होते. या मेळाव्याला जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, शिक्षणाधिकारी बी. एम. कासार, माजी जि. प. अध्यक्ष जयसिंग घोसाळे, माजी बांधकाम सभापती महेश ऊर्फ बाबू म्हाप, रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप देवळेकर, न. प.चे शिक्षणाधिकारी सुनील पाटील आदी उपस्थित होते.

स्थानिकांना रोजगार मिळावा ही आपली पहिल्यापासूनच भूमिका आहे. आपण पाठपुरावा केला नाही तर शासनाने निर्णय घेतला. कंत्राटी शिक्षक भरतीत स्थानिकच असणार आहेत. प्रशासनानेसुद्धा भरती करताना सहकार्य करावे. प्रत्येक दिवशी आदेश बदलू नये. जाचक असे कागदपत्र त्यांच्यावर लादु नये, असे सामंत यांनी सांगितले.

येत्या दोन दिवसांत ही शिक्षक भरती पूर्ण करावी, अशा सूचना जि.प. शिक्षण विभागाला दिल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर तहसीलदार रहिवाशी दाखल्याची अट करण्यात आली होती. ती शिथिल करण्यात आली आहे. ज्यांचे आधारकार्ड आणि सरपंच किंवा पोलिसपाटील दाखला जुळत असेल त्यांना तहसीलदार दाखल्याची अट घालू नये तशा सूचनाही शिक्षण विभागाला दिल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.

न.प.चा केला गौरव
शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेला कंत्राटी शिक्षक भरतीचे आदेश दिल्यानंतर राज्यात रत्नागिरी नगर परिषदेने ते पहिल्यांदा पूर्ण केले आहेत. जलद गतीने काम केल्यामुळे यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते न.प. चे शिक्षणाधिकारी सुनील पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ५ जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 PM 12/Oct/2024