शेतकऱ्यांची पेरणीची लगबग…

संगमेश्वर : दरवर्षी वाट पाहायला लावणारा पाऊस यावर्षी मे महिन्यात धो-धो पडला. त्यानंतर गेले दोन दिवस पावसाचा जोर कमी झाल्याने सूर्यदर्शन झाले. रोहिणी नक्षत्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी भातपेरणीला सुरुवात केली आहे.

संगमेश्वर तालुक्याच्या अनेक भागात गुरुवारी (ता.२९) पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने शेतकऱ्यांनी आज सकाळी भातपेरण्यांना प्रारंभ केला आहे. आज दिवसभर वातावरण ढगाळ राहिल्याने आता दरारोज सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी पडून भातरोपांची अपेक्षित वाढ होईल, अशी आशा शेतकरीवर्गाला वाटत आहे.

सकाळी अनेक ठिकाणी शेतांमधून राजा-सर्जाच्या जोड्या दाखल झाल्या. मोठ्या उत्साहामध्ये भातपेरणीला प्रारंभझाला. पुढील काही दिवस पावसाच्या अशाच हलक्या सरी कोसळून भातरोपांची उत्तम वाढ होईल, अशी आशा शेतकऱ्यांना वाटत आहे. आज झालेल्या पेरण्यांच्या ठिकाणी पावसाची उत्तम साथ मिळाल्यास २० जूनपर्यंत लावणीचा हंगामही सुरू होऊ शकेल, असे मत शेतकरीवर्गाने व्यक्त केले आहे.

यावर्षी हवामान विभागाने पाऊस चांगला होणार असल्याची सुवार्ता आधीच दिली असल्याने शेतकऱ्यांचा उत्साह आधीच वाढला आहे. शेतकरीवर्गाने रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन करून आपण आपल्या शेतात सेंद्रिय खतांच्या वापरावर अधिकाधिक उत्पन्नाचा प्रयोग यशस्वी करत आहोत. सध्या शेतीमध्ये एककाडीसारख्या बियाण्यांचे केले जाणारे प्रयोगही भरघोस उत्पन्न देणारे आहेत. आरोग्याच्यादृष्टीने महत्त्वाच्या लाल तांदळाचे पीक शेतकऱ्यांना चार पैसे मिळवून देणारे आहे -आशिष भिडे, शेतकरी, माभळे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 AM 30/May/2025