रत्नागिरीच्या सड्यावर ‘तणमोर’चे दर्शन

रत्नागिरी : जगातील ‘नष्टप्राय’ (क्रिटिकली एंडेंजर्ड) पक्ष्यांच्या यादीत समाविष्ट असलेला तणमोर या पक्ष्याचे रत्नागिरी शहराजवळील सड्यावर दर्शन झाले. हा पक्षी सलग दोन दिवस रत्नागिरीत वास्तव्याला होता, असे पक्षी निरीक्षक अॅड. प्रसाद गोखले यांनी सांगितले. या दर्शनामुळे जिल्ह्यातील सड्यांच्या संवर्धनाला महत्त्व आले आहे.

‘तणमोर’ म्हणजेच ‘लेसर फ्लोरिकन’ हा भारतात प्रदेशनिष्ठ असलेला पक्षी आहे. जगात तणमोरांची संख्या ३०० ते ७०० दरम्यान नोंदवण्यात आली आहे. अशा “नष्टप्राय” श्रेणीतील पक्ष्याची नोंद रत्नागिरीच्या सड्यावरून झाली. सोमवारी (ता. २६) पक्षी निरीक्षक अॅड. गोखले हे नेहमीप्रमाणे सड्यावर फिरत होते. त्या वेळी त्यांना तिथे तणमोराची मादी फिरताना दिसली. गोखले यांनी लगेच मादीची छायाचित्रेही टिपली आहे. याबाबत अभ्यासकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात आणि राजस्थान तणमोर पक्षी प्रजनन करतात. पावसाळ्यानंतर ते आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात स्थलांतर करतात. सध्या आंधप्रदेश आणि कर्नाटक या ठिकाणाहून तणमोरांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. सध्याच्या खराब वातावरणामुळे तणमोराची ही मादी रत्नागिरीत भरकटली असावी किंवा आराम करण्यासाठी थांबल्याची शक्यता वर्तवली आहे. हे पक्षी स्थलांतरादरम्यान रात्रीही प्रवास करत असल्याने वीजवाहक तारांमध्ये अडकून त्यांचा मृत्यू होतो.

तणमोर पक्ष्याचे रत्नागिरीतील सड्यावर दर्शन झाले होते. हा पक्षी किती दिवस वास्तव्य करतो यावर लक्ष ठेवले होते; मात्र त्याचे दोनच दिवस दर्शन झाले. बुधवारी (ता. २८) बुधवारी तो दिसलेला नाही- अॅड. प्रसाद गोखले, पक्षी निरीक्षक

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 30/May/2025