रत्नागिरी : नव्या संचमान्यतेचा आधार घेतल्यामुळे जिल्हा परिषदेचे सुमारे साडेपाचशेहून अधिक पदवीधर प्राथमिक शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत; मात्र या विषयी शिक्षकांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने पुढील आदेश होईपर्यंत शिक्षकांचे समायोजन करू नये, असे सांगितले आहे. त्यामुळे पदवीधर शिक्षकांना तात्पुरता दिलासा मिळणार आहे. याला प्राथमिक शिक्षणाधिकारी जयदेव कासार यांनी दुजोरा दिला आहे.
प्राथमिक शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सुरू आहे. बदली पोर्टलवर शिक्षकांची माहिती भरून घेण्यात आलेली आहे. पुढील टप्प्यात रिक्त शाळांची माहिती भरायवयाची आहे. ती येत्या काही दिवसांमध्ये भरली जाईल. तत्पूर्वी ही प्रक्रिया राबवण्यासाठी नवीन संचमान्यतेचा आधार घेण्यात आला आहे. त्यामध्ये २० पटाच्या शाळांमध्ये १ पदवीधर शिक्षक नियुक्त करता येणार आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शाळांमधील पदवीधर शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. ती संख्या सुमारे साडेपाचशेच्यावर आहे. काही शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती.
त्यावरील सुनावणीमध्ये न्यायालयाने २०२४-२५ च्या सुधारित संचमान्यतेनुसार शिक्षकांना अतिरिक्त ठरवून अन्य ठिकाणी समायोजित करू नये, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार याचिकाकर्त्या शिक्षकांना न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार कार्यमुक्त करू नये, अशा सूचना शासनाने एका पत्राद्वारे दिल्या आहेत. त्यामुळे पदवीधर शिक्षकांना तात्पुरता दिलासा मिळणार आहे.
कोकणात प्रत्येक वाडीवस्तीवर शाळा आहेत. त्या शाळांमधील पटसंख्या २०च्या आत आहे. पहिली ते पाचवीच्या वर्गामध्ये वीसपटाच्या असेल तर एकच शिक्षक तिथे राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होइल तसेच सहावी ते आठवीपर्यंत वीसपटाच्या आत एकच पदवीधर शिक्षक राहणार असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम होऊ शकतो- संतोष रावणंग, पदाधिकारी, शिक्षक संघटना
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 30/May/2025














