पावस : विधानसभा निवडणुकीमध्ये पावस बाजारपेठ मार्गाचे काँक्रिटीकरण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु त्या बाबतीत कोणत्याही हालचाली न झाल्यामुळे पहिल्याच पावसाळ्यात या मार्गावर खड्डे पडण्यास सुरुवात झाल्याने वाहनचालकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
गोळप ते बाजारपेठ मार्गे पावस या अरुंद रस्त्यामुळे पर्यायी मार्ग काढण्यात आला. त्यानंतर या मार्गावर रस्त्याला गटारे नसल्यामुळे दरवर्षी रस्त्यावरती वारंवार खड्डे पडले जात होते. तात्पुरते बुजवले जात होते; परंतु रस्त्याच्या दुतर्फा गटारे नसल्याकारणाने पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यासाठी कोणत्याही पर्याय नसल्यामुळे दरवर्षी खड्डे पडण्याचे प्रमाण कायमच होते. ५ वर्षांपूर्वी हा संपूर्ण रस्ता डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु खड्यांचा प्रश्न गेल्या ५ वर्षांत मिटलेला नाही.
पावसाळा सुरू झाला की खड्डे पडण्यास सुरुवात होते. गणपती दरम्यान तात्पुरते बुजवले जातात; परंतु त्यावरती ठोस कोणताही उपाय होत नसल्यामुळे वाहन चालकांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यात यावा, यासाठी विधानसभा निवडणुकीत विद्यमान तालुक्याच्या प्रतिनिधी हा संपूर्ण रस्ता काँक्रीट करण्याचे आश्वासन दिले आणि तो पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल असे सांगण्यात आले.
या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला. परंतु रस्ता काँक्रीटचे काम अद्याप पूर्ण होऊ न शकल्यामुळे पहिल्याच पावसात रस्त्यात खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पावस बाजारपेठ मार्गे जाण्यासाठी दुचाकी, रिक्षा या वाहनांना चालवणे धोकादायक ठरत आहे. या मार्गावरती वाहन चालवणे धोकादायक ठरत आहे. या रस्त्याचे खड्डे चांगल्या त-हेने बुजवावेत, अशी मागणी जोर धरत आहे.
या संदर्भात रिक्षा चालक प्रसाद पवार म्हणाले की, या बाजारपेठ मार्गावरती वाहने चालवणे दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे. त्यामुळे आम्हाला त्याचा आर्थिक त्रास सहन करावा लागतो तसेच ग्राहकांनाही त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या मार्गाचे काँक्रिटीकरण होईल तेव्हा होईल; परंतु सतत पडणारे खड्डे याकडे गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे निदान खड्डे चांगले तरी बुजविले तरच वाहन चालकांना प्रवास सुखमय होईल. या खड्ड्यांत वाहने चालवणे या मार्गावर धोकादायक ठरत आहे- प्रसाद पवार, रिक्षा चालक, पावस बाजारपेठ
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 30/May/2025














