आता हवालदारानाही गुन्ह्यांचा तपास करण्याचा अधिकार

आरवली : राज्याच्या पोलिस दलातील अपुऱ्या मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता, गृहविभागाने कॉन्स्टेबललाही (हवालदार) गुन्ह्यांचा तपास करण्याचे अधिकार दिले आहे. महाराष्ट्र शासनाचे गृह विभागाकडून या राजपत्राद्वारे याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी पोलिस हेड कॉन्स्टेबलला काही नियम आणि अटींची पूर्तता करणे बंधनकारक असणार आहे.

आता पोलिस दलात हेड कॉन्स्टेबल हा पदवीधर असावा. सोबतच ७ वर्ष सेवा पूर्ण केलेला आणि गुन्हे आन्वेषण प्रशिक्षण विद्यालयातील ६ आठवड्याचे विशेष प्रशिक्षण पूर्ण व परीक्षा उत्तीर्ण असलेला असणे गरजेचे राहणार आहे.

पुढे आलेल्या माहितीनुसार, शहरी भागात अपुरे मनुष्यबळ जरी असले तरी अधिकाऱ्यांची संख्या ही व्यवस्थित आहे. त्यामुळे गुन्ह्यांचा तपास हा पोलिस उपनिरीक्षक पदापासून वरील अधिकाऱ्यांकडे दिला जातो.

मात्र ग्रामीण भागात अपुऱ्या मनुष्यबळाबरोबरच अधिकाऱ्यांची संख्या ही कमी आहे. अशात एकाच अधिकाऱ्याकडे अनेक गुन्ह्यांचा तपास दिल्याने अधिकाऱ्यांवरील ताणही वाढतो. गुन्हे उकलीचे प्रमाणही कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातच आता पोलिस दलात उच्च शिक्षित तरुणही भरती झाल्याने त्यांचा अनुभवाची दखल घेऊन, त्यांच्याकडे छोट्या गुन्ह्यांचा तपास देण्याचा गृहविभागाने निर्णय घेतला आहे. ज्यामुळे अधिकाऱ्यांवरील ताण काही प्रमाणात कमी होईल आणि गुन्हे उकलीचा आलेखही वाढेल. त्या अनुषंगाने गृहविभागाने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 AM 30/May/2025