राजापुरात शासकीय रिक्त पदांमुळे करावे लागतेय आठवड्याचे सातही दिवस काम

राजापूर : शासनाने सर्व शासकीय कार्यालयात ५ दिवसांचा आठवडा केला असला, तरी प्रत्येक कार्यालयात मोठ्या प्रमाणावर असणारी रिक्त पदे पाहता सध्या कार्यरत शासकीय कर्मचारी कामच संपत नसल्याने आठवड्याचे सातही दिवस कार्यालयीन कामकाजात गढून गेल्याचे दिसून येत आहे. राजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी ही दोन्ही महत्त्वाच्या पदांचा कार्यभार सध्या प्रभारींच्या हाती आहे.

राजापूर नगर परिषदेत अधिकारी कर्मचाऱ्यांची मंजूर पदे ५९ असली तरी सद्यस्थितीत त्यातील १८ पदे रिक्त आहेत, ६ पदे कमी करण्यात आली आहेत. परिणामी, राजापूर नगर परिषदेचा कारभार ३५ कर्मचारीच सांभाळत आहेत. अशीच अवस्था जिल्हा परिषद बांधकाम उपविभागात आहे. या कार्यालयात ३० मंजूर पदे आहेत. मात्र त्यातील १७ पदे दीर्घकाळ रिक्त असल्याने कार्यरत १३ कर्मचाऱ्यांवर कामाचा भार आहे.

लांजा राजापूरचा महसुली कारभार सांभाळणाऱ्या उपविभागीय (प्रांत) कार्यालयात १० पदे मंजूर आहेत, २ पदे रिक्त आहेत. २०१३ पासून गेली १२ वर्षे स्टेनो पद रिक्त आहे. प्रांत कार्यालयातील ८ कर्मचारी दोन्ही तालुक्यांचा कारभार सांभाळत आहेत. पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकाऱ्यांसह, गट शिक्षणाधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी या पदांसह सुमारे ६० पदे रिक्त आहेत. तहसील कार्यालयात तलाठी, कोतवालसह एकूण १७६ पदे मंजूर असून ४९ पदे रिक्त आहेत.

राजापूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम, राजापूर तालुका वनविभाग, भूमिअभिलेख कार्यालयातही अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामाचा निपटारा करण्यासाठी सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांना मात्र तारेवरची कसरत करत आठवड्यातले सातही दिवस काम करावे लागत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 30/May/2025