रत्नागिरी : यंदा मान्सून आठ दिवस आधीच आल्यामुळे पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले आहे. ऐन उन्हाळ्यात मोठा पाऊस झाल्यामुळे रत्नागिरी येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे पावसाळी साहित्याची बाजारपेठ मे महिन्यातच शहरासह विविध तालुक्यात बहरली आहे. पावसापासून बचाव करण्यासाठी आकर्षक रंगीबेरंगी छत्र्या, रेनकोट, जॅकेट, टोपी यासह विविध साहित्य खरेदीसाठी बाजारात नागरिकांची झुंबड उडत आहे. दरम्यान, यंदाचा पावसाळी हंगाम साधण्यासाठी दुकानदार व व्यापारी, किरकोळ विक्रेते सज्ज झाले आहेत.
यंदा मान्सून लवकर आल्यामुळे मागील आठ दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात पावसाने थैमान घातले आहे. उन्हाळ्यात पाऊस झाल्यामुळे कित्येक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाळी साहित्य खरेदी न केल्यामुळे नागरिकांची दमछाक झाली आहे.
दरम्यान, मान्सून कोकणात दाखल झाल्यामुळे कुठे मुसळधार तर कुठे संततधार पाऊस सुरूच आहे. पावसात बचाव करण्यासाठी छत्री, रेनकोट खरेदीसाठी नागरिक बाजारपेठेत, दुकानात गर्दी करत आहेत. यंदा हंगाम सुरू होण्यापूर्वीच साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. महिला, तरूणी, शाळेच्या मुलांसाठी विविध प्रकारच्या आकर्षक छत्र्या, सर्वप्रकारच्या वयोगटासाठी रंगीबेरंगी जॅकेट, रेनकोट साहित्याने दुकाने सजली आहे. स्वस्तातील स्वस्त व विविध ब्रेडेंड कंपन्याच्या छत्र्या, रेनकोट, जॅकेट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अनेकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानासमोर हे साहित्य ठेवले आहे. सर्वच ठिकाणी नागरिक खरेदीसाठी गर्दी करत आहेत.
याठिकाणी छत्री, रेनकोट खरेदी
रत्नागिरी शहरातील माळनाका, एसटी बसस्थानक परिसर, रेल्वे स्टेशन, साळवी स्टॉफ परिसर, कोकणनगर, जे. के. फाईल, मारूती मंदिर, जिल्हारूग्णालय, मजगाव, जयस्तंभ, मांडवी, कारवांचीवाडी, लक्ष्मी चौक, यासह जिल्ह्यातील लांजा, संगमेश्वर, राजापूर, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, देवरूख या ठिकाणच्या बाजारपेठेत, दुकानाही पावसाळी साहित्य विक्रीस ठेवण्यात आले आहे.
ताडपत्री, प्लास्टिकलाही वाढली मागणी
पावसाळ्यापूर्वीच घरे शाकारणी व पावसाचे पाणी घरात शिरू नये म्हणून उपाययोजना केली जात आहे. त्यासाठी ताडपत्री व पत्र्यांचा वापर केला जातो. यंदा पावसाने मान्सूनपूर्वीच हजेरी लावल्याने या साहित्यांनाही मागणी वाढली आहे. घरावर तसेच गवत गंजीवर घाण्यासाठी प्लास्टिक खरेदी सुरू आहे. ताडपत्री व प्लास्टिक कागदांची बाजारपेठही सजली आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 30/May/2025














