राजापूर : हातिवले नाक्यावर टोल वसुलीच्या हालचालींना वेग..

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यामध्ये हातिवले येथे उभारण्यात आलेल्या टोलनाक्यावर पुन्हा टोलवसुलीला सुरुवात होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी टोलनाका सुरू करण्याच्या दृष्टीने पाहणी केली. यापूर्वी दोन वेळा प्रशासनाने टोलवसुली करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तालुकावासीयांनी आंदोलन छेडत टोलवसुली थांबविली होती. आता दोन-अडीच वर्षांनंतर पुन्हा टोलवसुलीला सुरुवात झाल्यास टोलविरोधी आंदोलन पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे राजापूर तालुक्यातील काम जवळपास पूर्ण झाले आहे. चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांवर टोल आकारणी करण्यात येणार आहे. याकरिता रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या राजापूर तालुक्याच्या हद्दीत हातिवले येथे टोल नाका उभारण्यात आला आहे. अडीच वर्षांपूर्वी टोल नाक्याचे कामदेखील पूर्ण झाले असून त्यावेळी टोल वसुलीचे कंत्राट एमटी करिमुनिसा या कंपनीला देण्यात आले होते.

यापूर्वी जून 2022 पासून या टोल नाक्यावर टोलवसुलीला सुरुवात होणार होती. मात्र सर्वच राजकीय पक्षांनी टोलवसुलीला विरोध दर्शविला. त्यामुळे टोल वसुली सुरू करण्यात आली नव्हती. त्यानंतरही दोन वेळा टोलवसुली सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र राजापूरवासीयांनी टोल नाक्यावर आंदोलन करत टोलवसुलीला विरोध केला होता. यावेळी आंदोलकांनी टोल नाक्यावर महामार्गालगत ठिय्या आंदोलनही केले होते. त्यावेळी विद्यमान आमदार निलेश राणे, माजी आमदार सौ. हुस्नबानू खलिफे यांनीदेखील आंदोलनात सहभाग घेत टोलवसुली थांबविली होती. तेव्हापासून सुमारे अडीच वर्षे टोलवसुली करण्यात आलेली नव्हती.

महामार्गाच्या चौपदरीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले असले तरी अद्यापही शहरामध्ये एसटी डेपोसमोरील उड्डाण पुलावरील रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. तसेच काही ठिकाणी दिवाबत्ती, प्रवासी निवारा शेड, संरक्षक भिंती, सर्व्हिस रोड, संरक्षक कठडे, वृक्षलागवड अशी कामे प्रलंबित आहेत. याशिवाय चौपदरीकरण कामात नद्या, वहाळ, पायवाटा, शेती अशा ठिकाणी टाकलेली माती, भराव अद्यापही हटविण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात ये-जा करण्याच्या वाटा बंद झालेल्या आहेत. त्यामुळे संबंधित कामे पूर्ण झाल्याशिवाय टोलवसुली करू नये अशी मागणी कायम आहे. त्यामुळे पुन्हा टोलवसुलीला सुरुवात झाल्यास टोलविरोधी आंदोलन पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 30-05-2025