रत्नागिरी : रत्नागिरी शहरात अत्याधुनिक सुसज्ज असे नवीन एसटी बसस्थानक उभारले असून, नवीन बसस्थानकात वाहतूक सुरू झाली आहे नव्या बसस्थानकाचे रत्नागिरीकरांनी जल्लोषात स्वागत केले; मात्र आता जुने रहाटाघर बसस्थानक ओस पडले आहे. त्याठिकाणी सब शांती शांती है अशी परिस्थिती आहे. शहर, ग्रामीण फेऱ्या नव्या बसस्थानकावरून जात आहेत. दरम्यान, जुन्या रहाटाघर बसस्थानकावरून मुंबई, पुणे, बोरिवली, कोल्हापूर, सोलापूर यासह लांब पल्ल्याच्या एसटी बसेस सोडण्याच्या विचारात प्रशासन असून, अद्याप निर्णय झालेला नाही. लवकरच हा निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले.
पूर्वी जुन्या रहाटाघर बसस्थानावर मोठी गर्दी व्हायची. मोठी गजबज असायची. मात्र, आता नवीन बसस्थानक झाल्यामुळे जुन्या बसस्थानकात शुकशुकाट दिसून येत आहे. मोकाट जनावरे, कुत्र्यांचा वावर त्याठिकाणी वाढला आहे. दरम्यान, जुन्या बसस्थानकावरून लांब पल्ल्याच्या गाड्या सोडाव्यात अशी मागणी होत आहे. त्यामुळे अद्याप तरी निर्णय झालेला नाही. सध्यातरी शहर भागासाठी खाली बसस्थानक तर ग्रामीण भागासाठी पहिल्या मजल्यावर बसस्थानक आहे. दोन्ही मार्गावरून शहर, ग्रामीण बससेवा सुरू आहे. त्याला प्रवाशांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.
सध्यातरी नवीन बसस्थानकावरून एसटीची बससेवा सुरू आहे. जुन्या बसस्थानकावर बससेवा सुरू करायचे तर कर्मचारी द्यावे लागतील त्यामुळे कर्मचारी कमी पडतील. रहाटाघर बसस्थानकावरून लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्याच्या विचारात असून, अद्याप निर्णय झालेला नाही. लवकरच निर्णय होईल. तेथील गाळेधारकांचा करार पद्धती असतो. ज्यांना नवीन बसस्थानकावर गाळा हवाय, त्यांनी मागणी करावी- बालाजी आडसुळे, आगार व्यवस्थापक, रत्नागिरी
गाळेधारकांचे काय होणार
जुन्या रहाटाघर बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात टपरीवाले, रिक्षा चालक होते. त्यांचा जम चांगला बसला होता. मात्र आता नवीन बसस्थानक झाल्यामुळे त्याठिकाणी कोणीच फिरकत नसल्यामुळे व्यापारी चिंतेत आहेत. गर्दी वाढत असल्यामुळे चांगला व्यवसाय होत होता. आता मात्र बसस्थानकावर सामसूम असल्यामुळे व्यवसाय होत नाही. नव्या बसस्थानकात त्यांना गाळा द्यावा, अशी मागणी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 PM 30/May/2025














