चिपळूण : मान्सूनमध्ये वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. चिपळूण व गुहागर तालुक्यातील १ लाख ६६ हजार वीजग्राहकांना अखंडित वीजपुरवठा व्हावा यासाठी सहा एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. या एजन्सीच्या माध्यमातून आपत्तीच्या काळात घडणाऱ्या नैसर्गिक संकटाचा सामना केला जाणार आहे.
महावितरण कंपनीने नेमलेल्या सहा एजन्सी आपत्तीच्या काळात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. महावितरण कंपनीने या एजन्सीला आगाऊ कामाचे आदेश दिले आहेत. या एजन्सीने काम केल्यानंतर केलेल्या कामाचे देयक त्यांना आदा केले जाणार आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात विजेचे खांब उभे करणे, धोकादायक झाडांच्या फांद्या तोडणे, तुटलेल्या तारा काढून नवीन तारा बसवणे इत्यादी कामे या एजन्सीच्या मार्फत होणार आहेत. जी कामे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तत्काळ करणे शक्य होणार नाही ती कामे खासगी एजन्सीच्या मार्फत केली जाणार आहेत.
गेल्या काही वर्षांचा अनुभव आणि हवामानखात्याचा अंदाज लक्षात घेता मे महिन्यात संपूर्ण जिल्ह्यात असह्य उष्णता असते. त्यातच अचानक येणाऱ्या वादळीवाऱ्यांमुळे आणि विजांच्या कडकडाटामुळे वीजवितरण यंत्रणेवर परिणाम होतो. दर सोमवारी दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा खंडित केला जातो; मात्र अलीकडे नैसर्गिक घटना घडली की, तत्काळ वीजपुरवठा खंडित
केला जातो. हा प्रकार मागील काही दिवस सातत्याने सुरू आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी गुहागर आणि चिपळूण तालुक्यात महावितरणचे नियमित कर्मचारी हे रात्रंदिवस आपत्तीचा सामना करण्यासाठी तयार कार्यरत आहेत. चिपळूण शहरात मॉन्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीच्या कामाला मोठ्या प्रमाणात वेग देण्यात आला आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर तक्रारींमध्ये वाढ होऊ नये यासाठी सध्या आम्ही युद्धपातळीवर काम करत आहोत. नागरिकांनी सहकार्य करावे. चिपळूण आणि गुहागरमधील आमचे कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत- अमित गेडाम, कार्यकारी अभियंता, चिपळूण महावितरण.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 PM 30/May/2025














