चिपळूण : या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झाले असले तरी मासे खवय्यांना मात्र मोठा लाभ झाला आहे. या पावसामुळे वाहणाऱ्या नदी, नाल्यांतून वळगणीचे मासे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहत शेतात, ओहोळात शिरले आहेत.
चला चला.. वळगण आली रे.. अशी हाकाटी देत गावकरी, बच्चेकंपनी, आदिवासी झिले, मच्छरदाण्या आणि मासेमारीचे पाग घेऊन वळगणीचे मासे पकडत आहेत.
चविष्ट असणाऱ्या या माशांवर खवय्यांच्या उड्या पडत आहेत. चिपळूण तालुक्यातील शिरगाव, खेडीं-पिंपळी आणि बहादूरशेख नाक्यावर रस्त्यालगत या माशांची विक्री होत आहे. पिंपळी, शिरगाव येथे कातकरी समाजातील लोक नदीतील मासे पकडण्यासाठी नदीवर बांधन घालतात. पहिल्याच जोरदार पावसाने खरबे, मळे, निवट्या, पितोळ्या, शिवडा, खवल, दांडाळी, बाम, पांडरूस अशा वळगणीच्या माशांनी प्रवाहाच्या दिशेने उसळ्या मारल्या आहेत.
पोटात असलेली अंडी सोडण्यासाठी हे मासे प्रवाहाच्या विरुद्ध पोहत ओहोळ आणि शेतात शिरतात. अत्यंत चविष्ट असणारी ही वळगण पकडण्यासाठी चिपळूण तालुक्यातील गावागावांत गावकरी विशेषतः गाठीला दोन पैसे मिळवण्यासाठी कातकरी ही वळगण जाळ्यात धरण्यासाठी फिल्डिंग लावत आहेत. ग्रामीण भागात वळगणीच्या माशांना त्यांच्यातील अंड्यांमुळे मोठी मागणी असते. नदीला जोडलेल्या छोट्याशा ओहोळावर बसून पागीर टाकत हे मासे पकडले जातात, तर उंचावरून खाली पडणाऱ्या मोरीच्या प्रवाहाजवळ ‘झिला’ लावून मासे पकडले जातात. तासाने जमलेले मासे गोळा केले जातात.
पावसाळ्यात मिळणाऱ्या अंड्यांनी भरलेल्या वळगणीच्या माशांना मोठी मागणी असते. अवघ्या काही तासांत हे मासे विकले जातात. त्यामुळे आम्हाला चांगला रोजगार मिळतो. – भरत निकम, कातकरी समाजातील मच्छीमार
मळ्याची चवच भारी
गोड्या पाण्यातील चवदार, लज्जतदार वळगण म्हणजे मळ्याचे मासे. चिपळूण तालुक्यातील खवय्यांची हे मासे पहिली पसंती आहे. आदिवासी आणि मच्छीमार टोपलीतून ही मासळी आणतात तेव्हा अवघ्या पाच मिनिटांत अख्खी टोपली विकली जाते. १८० ते २०० रुपये किलोने मळ्याचे मासे विकले जातात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:00 PM 30/May/2025














