सोमेश्वर, चिंचखरीमध्ये विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त; महावितरणला ग्रामस्थांचा निर्वाणीचा इशारा!

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत सोमेश्वर (सोमेश्वर, नवा सोमेश्वर, चिंचखरी) कार्यक्षेत्रात विजेच्या सततच्या लपंडावामुळे नागरिक चांगलेच मेटाकुटीला आले आहेत. या संदर्भात ग्रामस्थांनी यापूर्वीही महावितरणकडे तक्रारी केल्या होत्या, मात्र त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याने आता पावसाळा तोंडावर असताना ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महावितरणने तातडीने उपाययोजना न केल्यास जनआंदोलनाचा पवित्रा घेण्याचा निर्वाणीचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

सोमेश्वर ग्रामपंचायतीने २० मे २०२५ रोजी उपकार्यकारी अभियंता (ग्रामीण), महावितरण रत्नागिरी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या कार्यक्षेत्रात विजेचा पुरवठा अत्यंत अनियमित असून वारंवार वीज खंडित होते. उन्हाळ्यात जर ही परिस्थिती असेल, तर पावसाळ्यात या समस्येची तीव्रता अधिक वाढण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. घरात वृद्ध, आजारी व्यक्ती आणि लहान मुलांना या अनियमित वीजपुरवठ्याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

यापूर्वीच्या पत्रांनाही महावितरणकडून योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. त्यामुळे आता या पत्राद्वारे त्यांनी महावितरणला कळवले आहे की, सोमेश्वर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा. अन्यथा, ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत होऊन परिस्थिती हाताबाहेर गेल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरणची राहील, असा स्पष्ट इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.

या गंभीर समस्येवर महावितरण काय उपाययोजना करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. जर तातडीने कार्यवाही न झाल्यास सोमेश्वर, नवा सोमेश्वर आणि चिंचखरी येथील ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडण्याच्या पवित्र्यात असल्याचे चित्र आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:27 PM 30/May/2025